“दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं…”, मनसेचं ठाकरे आणि शिंदे गटावर टीकास्त्र

मुंबई | Prakash Mahajan On Thackeray Group And Shinde Group – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून वाद सुरू आहे. तसंच सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष दसरा मेळाव्यावर आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, मनसेनं दसरा मेळाव्यात विचार नाही, तर नाटकं पहायला मिळतील अशी टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील अशी टीका केली आहे.

यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, “पहिल्यांदाच असं होणार आहे की, ज्यांचे जास्त लोक असतील तेच खरी शिवसेना असं ठरणार आहे. विचार ऐकायला कोणीच येणार नाही. आज विचारांना काहीच महत्त्व नाही, येथे वस्त्रहरणच होणार आहे. सोनं वैगेरे नाही, एकमेकांच्या अंगावरील चिंध्याच गोळा कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे, दोन्ही मेळावे यशस्वी होणं हे आयोजकांपेक्षा त्यांच्या मागे जी शक्ती त्यांची मोठी गरज आहे. त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.”

“उद्या शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा कमी होणार आहे. पण यशस्वी झाल्यास नैतिक धैर्य वाढेल. बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागेल, त्यामुळे हे मेळावे यशस्वी करण्याची गरज त्या संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे. यावरच महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. अंधेरी विधानसभा निवडणूक, मुंबई कोणाच्या हातात जाणार यासाठी दोन्ही गटांच्या मागे असणारी शक्ती मेळावे यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न करतील”, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

Sumitra nalawade: