मुंबई | Prakash Raj Directly Questioned Amit Shah On Jay Shah’s Refusing To Hold Flag – आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारतानं पाकिस्तानला धुळ चारत 5 विकेट्स राखून विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्याचा सेलिब्रेटींसोबतच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आनंद लुटला. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना जिंकल्यानंतर त्यांनी सहकाऱ्याने दिलेला भारताचा झेंडा हातात पकडण्यास नकार देतानाची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या कृतीवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामध्ये अभिनेते प्रकाश राज यांनी देखील केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे.
प्रकाश राज यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी जय शाह यांच्या कृतीवर भाष्य केलं आहे. “प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह…जय शाह यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी भारताचा तिरंगा हातात धरुन फडकवायला हवा हे गरजेचं नाही. पण जर कुणी बिगर भाजप, बिगर हिंदू किंवा माझ्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असं काही केलं असतं, तर त्यावर तुमची किंवा भाजपाच्या भक्तमंडळींची काय प्रतिक्रिया असती?” असा सवाल प्रकाश राज यांनी केला आहे. प्रकाश राज यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने धमाकेदार कामगिरी केली. या सामन्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह सुद्धा उपस्थित होते. भारताने हा सामना जिंकल्यानंतर जय शाह यांनीही आधी जल्लोष केला. त्यानंतर ते टाळ्या वाजवत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या हातात तिरंगा देऊ केला. मात्र शाह यांनी ‘नो, नो’ म्हणत तिरंगा हातात घेण्यास नकार दिला आणि ते टाळ्या वाजवत राहिले. ही सर्व दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.