राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : विकासकाकडून बेडर्स कडून धोकाधडी होत असल्याची अनेक प्रकरणे पुण्यात पाहायला मिळतात. बळी तो कान पिळी या न्यायाने सत्ता संपत्तीच्या सलगीतून माजलेले ठेकेदार कमकुवत नागरिकांवर अन्याय करतात. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे कोणीच उभे राहत नाही आणि अनेकदा अशा लोकांना नरकयातना सहन कराव्या लागतात , हा इतिहास आहे परंतु प्रथमच वृद्ध दांपत्याच्या हाकेला ओ देऊन चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी आणि या दांडगाहीच्या कारभाराच्या विरोधात त्यांचे शिलेदार असलेले नाना भानगिरे यांनी त्या भिंतीवर धडक कारवाईची त्वरित मागणी केली. यातून सामान्यांना दिलासा मिळावा असा काहीसा प्रकार सध्या पुण्यात घडला आहे.
गोष्ट आहे एका वृद्ध दांपत्याची. हे दाम्पत्य न मतांचे ठेकेदार ना भल्या मोठ्या संपत्तीचे वारसदार त्यामुळे यांच्याकडे कोण लक्ष देणार. परंतु त्यांच्या एका ट्विटने चक्क मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि प्रमोद नाना भानगिरे यांच्या आक्रमकतेमुळे त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या हक्काचा रस्ता होण्याची सोय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले. एका विकासाने दांडगाई करून चक्क त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भिंत बांधून टाकली. ही भिंत त्यांना कारावासाच्या यातना देत आहे.
या भिंतीमुळे वृद्ध दांपत्याच्या घरी जाणारे रस्ते बंद झालेत. सध्या मूलभूत सुविधा देखील त्यांना मिळू शकत नाहीत. त्यांनी प्रयत्न केले, परंतु मदमस्त ठेकेदार आणि महापालिकेच्या असमवेदनशील कारभारापुढे त्यांचे काही चालेना. अखेर त्यांनी एक ट्विट केले आणि आपली बाजू थेट मांडली राज्याचे संवेदनशील मानले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेतली. पुण्यातील आपले शिलेदार असलेले नाना भानगिरे यांना वस्तूस्थिती तपासण्याचे आदेश दिले. तातडीने भानगिरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन सूत्र हलवली आणि आज जर ही भिंत पाडली नाही तर आम्ही स्वतः कार्यकर्ते घेऊन भिंत पाडू असा इशाराही देऊन टाकला.
एनआयबीएम रोडवर एका बंगल्यात हे वृद्ध जोडपे राहत आहे. त्या बंगल्याकडे जाणारा जवळपासच्या एका सोसायटीने तीन महिन्यांपूर्वी त्यांचा रस्ता बंद केला. रस्ता वृद्धीकरणाच्या कामासाठी महापालिकेने त्यांना वापरता येईल असा मोकळा भूखंड खोदला आहे. त्यामुळे जेहरा घडियाली आणि त्यांचे ७९ वर्षीय पती मन्सूर एकाकी पडले आहेत.
सामान्यांचे अश्रू पुसण्याचे ध्येय : नाना भानगिरे
याबाबत नाना भानगिरे यांनी राष्ट्रसंचारशी बोलताना सांगितले की, या वृद्ध दाम्पत्याच्या अडचणीची संवेदना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली. आणि वृद्ध दांपत्याचा बंगला हा कायदेशीर आहे. त्यांना रस्ता मिळणे हे कायदेशीरच आहे. कुठल्या ठेकेदाराने कशी भिंत बांधली आणि कोणत्या सोसायटीने काय केले याची आम्ही सगळी माहिती घेतली आहे. आज जर भिंत तोडण्यात आली नाही तर आम्ही ती फोडून टाकण्याचा इशारा दिला आहे. सत्ता असो नसो सामान्यांचे अश्रू पुसणे हाच एकनाथ शिंदे यांचा ध्यास आहे आणि आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत .