प्रशांत जगतापांच्या भावी खासदारकीवर फुली; उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग!

पुणे : (Prashant Jagtap Pune City Politics) केवळ पवार कुटुंब यांची जवळीकता आणि त्यांच्या दौऱ्यात मागे पुढे करण्याचे नेतेपद मिरविण्यावरून आधीच टीकेचे धनी होत असलेल्या प्रशांत जगताप (Prashan Jagtap) यांच्या गुरुवारी अतिउत्साहीपणामुळे त्यांच्या भावी खासदारकीवर आता अजित पवारांनीच (Ajit Pawar) फुली मारली असल्याचे दिसत आहे.

प्रशांत जगताप यांच्या निष्क्रियतेबाबत आधीच पक्षांतर्गत कुरबुरी सुरू होत्या. दिवसभर पक्ष कार्यालयात बसून आपल्या या पदाचे पक्षसंघटनेपेक्षा इतर गोष्टींसाठी मार्केटिंग करणाऱ्या जगताप यांनी गुरुवारी अतिउत्साहात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भावी खासदारकीचे प्रोजेक्शन करण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा आहे. परंतु चाणाक्ष असलेल्या अजित पवार यांनी त्यांना जोरदार चपराक दिली. कोणाला किती मते पडली, कोणाची कशी ताकद आहे, हे पाहून आपण लोकसभेचा उमेदवार ठरवू असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

हे सांगत असताना प्रशांत जगताप यांना आजपर्यंत काय काय दिले याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. हे सगळं करत असताना पक्ष पुणे शहरांमध्ये किती वाढला याची देखील खंत अप्रत्यक्षपणे त्यांनी बोलून दाखवली. नगरसेवक पदापासून, महापौर पदापासून ते शहराचा पक्ष त्यांच्याकडे देईपर्यंत अनेक जबाबदाऱ्या आणि अधिकार प्रशांत जगताप यांना देण्यात आल्या. परंतु ज्या वेगाने भारतीय जनता पक्ष आणि आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुणे शहरांमध्ये वाढत आहे. त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस वाढू शकला नाही, ही खरी वस्तूस्थिती आहे.

वास्तविक पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार यांचे वैयक्तिक योगदान खूप मोठे आहे. त्याचे भांडवल केवळ आपले स्वभांडवल वाढविण्याकरता करून घेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकरिता संघटन कौशल्य दाखवले नाही. प्रशांत जगताप यांची अनेकांना तुसडेपणाची वागणूक, माध्यमांसोबत फटकून राहण्याची सवय आणि एकूणच पवारांच्या छत्रछायेमुळे आलेला अहंभाव यामुळे सामान्य पुणेकर आणि काही निष्ठावंत कार्यकर्ते देखील पवार आणि राष्ट्रवादी यांच्यापासून दूर होऊ लागले. त्यात भावी खासदार अशी स्वप्न पडत असताना प्रशांत जगताप यांनी एक प्रकारे अजित पवार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असे मानले जाते.

आपल्याच काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोस्टरबाजी आणि फलकबाजी करून पक्ष नेत्यांना नेमका काय संदेश त्यांना द्यायचा होता? याची आकलन होईना. परंतु बारामतीची जाण असलेल्या अजित पवारांनी आज प्रशांत जगताप यांच्या पदरात त्यांचे माप टाकून त्यांची योग्य ती जागा दाखवली आणि मिश्किलपण का होईना त्यांचा त्यांच्या स्वप्नांना पूर्णविराम दिला, असे मानले जाते.

Prakash Harale: