मुंबई : आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पत्रात सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. तर काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेना फोडत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत. येत्या वर्षीत मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरे होईल असे प्रताप सरनाईक हे पत्रात म्हणाले होते.
या सर्व प्रकरणांवर प्रताप सरनाईक यांनी एक वर्षापुर्वी पाया रचला होता. एकनाथ शिंदे यांनी कळस चढवला आणि विधान परिषद निवडणुकीच्या रात्रीच शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सूरत नंतर आता गुवाहाटी गाठले. यामुळे शिवसेनासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला.