बुलढाणा : (Prataprao Jadhav On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या 40 आमदारांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून राज्यात राजकीय भूकंप घडवून आणला होता. त्यामुळे संपूर्ण शिवसेना खिळखिळी झाल्याचे पहायला मिळालं. त्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचादेखील समावेश आहे.
दरम्यान, बुलढाण्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंनी जिल्ह्यातील बंडखोर आमदार आणि खासदारांवर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. “इथले गद्दार खासदार आणि आमदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, त्यांचा चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्याला खासदार प्रतापरावं जाधवांनी खुलं आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर उद्दव ठाकरेंनी माझ्या विरोधात बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असे जाधव म्हणाले. मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजकडून लढण्याचा विषय येतो कुठे. आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो असल्याचे प्रतापराव जाधव म्हणाले.