मुंबई – Mumbai Bank : १९९९ पासून २०२१ पर्यंत मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिक आणि सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे अध्यक्षपद गमावलेले भाजपचे प्रवीण दरेकर पुन्हा एकदा मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यांनतर मुंबई बँकेतही सत्तापालट होणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच सुरु होती.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुंबई बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनंतर आज (शुक्रवार, ५ ऑगस्ट) निवडणूक पार पडली. त्यात अध्यक्षपदावर प्रवीण दरेकर हे बिनविरोध निवडून आले. सिद्धार्थ कांबळे हे आता बँकेचे उपाध्यक्ष असणार आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई बँकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यात दारेकारांच्या सहकार पॅनलने २१ जागा जिंकून बाजी मारली होती. मात्र, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भाजपला धक्का देण्यात आला होता. सिद्धार्थ कांबळे यांच्याकडे अध्यक्षपद द्यावे लागले होते. प्रवीण दरेकर प्रत्यक्षात मजूर नसतानाही त्यांनी खोटे कागदपत्रे दाखवून १९९९ पासून २०२१ पर्यंत बँकेच्या संचालक मंडळात मजूर प्रवर्गातून निवडणूक लढली. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.