जुलमी राजवट म्हणजे किती असावी ? आणि या राजवटीच्या मुखियांचे चेहरे देखील किती लबाड आणि ढोंगी असावेत याला काही प्रमाण आहे का ? आता बघा ना प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात डुबकी लावल्यानंतर सर्व पापांपासून मुक्तता होते हे आमच्या प्रभागातील बूथ प्रमुखा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येकाने सांगितलं. मोठ मोठ्या धर्माचाऱ्यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केले.
‘ पापांपासून मुक्ती’ म्हणजे ही गेल्या १४४ वर्षांनंतर आपल्याला मिळालेली एक अनमोल संधी आहे. किंबहुना आपल्या पिढीमध्ये ही आपल्याला मिळालेली एकमेव संधी आहे. आता यावर तुम्ही _ आम्ही जसा विश्वास ठेवला तसा खोक्या भाऊंनीही ठेवला. !!
इतकी मोठी संधी साधण्यासाठी खोक्या प्रयागराजला गेला. त्याने तेथे डुबकी लावली. गेल्या बारा वर्षात तो कधीही प्रयागराजला गेला नाही. प्रयाग राज च नव्हे इतक्या वर्षात आलेल्या अनेक लहान _ मोठ्या कुंभमेळ्यांनाही त्याने कधी हजेरी लावली नाही . मनसोक्त आणि सुखनैव संचार करत त्याने आयुष्य जागवले . पैके कमावले. तसे उधळलेही. नोटांची बंडल फेकली. हात सळसळू लागले की काठी घ्यायची आणि समोरच्याला उताणा करत त्याचे तळपाय बडवायचे….. नामचीन गुंडच नव्हे तर थर्ड डिग्री देणाऱ्या पोलिसांनाही अशा कल्पना सुचू शकत नाहीत अशा नवनवीन कल्पना खोक्याच्या ‘ सुपीक ‘ डोक्यातून आल्या. त्याने त्यावर मतदारसंघात ( चार-पाच ) बऱ्यापैकी वचक बसवला.
आता हे सगळं करत असताना त्याला जर तुम्ही गुन्ह्याचं, कलंकाचं, पापाचं _ शापाचं लेबल लावत असाल तर तो विषय वेगळा..!
बरं आता तुम्हीच सांगितलेल्या आणि पाजळलेल्या धर्मप्रकांडपांडित्या बरहुकूम, मुक्त होण्याकरिता प्रयागराजला गेला आणि तेथे च घात झाला .
बारा वर्षात एवढे माखलेले रक्ताचे हात भिजवून आणि ते पुन्हा दहा दा धुवून देखील त्याच्यावर तुम्ही एकही कलंक लावू शकला नाही, मात्र प्रयागराच्या भूमीवर पाऊल ठेवताच थेट तीन तीन गुन्हे तुम्ही दाखल केले .
म्हणजे एकीकडं पाप मुक्त, शाप मुक्त होण्यासाठी तुम्ही रस्ते दाखवायचे आणि तेथे जाऊन मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करत असताना तुम्ही ‘ जुन्या पापांचा हिशोब’ लावत बसायच . हा कुठला न्याय ?
बंटी और बबली मधला शेवटचा प्रसंग आठवला. आयुष्यभर खोट्या नावाने प्रवास करणारा बंटी मौज मजेत जगतो. पहिल्यांदाच सहारनपुरच्या स्टेशनवर आपलं खरं नाव सांगतो आणि तिथेच तो पकडला जातो…. बिचारा खोक्याचं असंच काहीतरी झालं !
म्हणजे गेली बारा वर्षे चालल होतं तेच ‘ आमचं बरं चाललं होतं’ , उजळ माथ्याने खोक्या बागडत होता.. गंगा , भागीरथी, यमुना _ जमुना अशा प्रवाहांच्या दिशेला पोहण्याचेच नव्हे, चालण्याचे नव्हे तर तिकडे बघण्याचा देखील मोह त्याला झाला नाही.
मात्र पापक्षलनाच्या तुमच्या धर्म कथांवर विश्वास ठेवून तो प्रयागराज ला गेला आणि स्वतःचा घात करून घेतला. आता कोण विश्वास ठेवेल तुमच्या या शुद्धीकरणाच्या कथा कहाण्यांवर ???
हे काही पटलं नाही. पुण्यमान खोक्याचा सुरू असलेला प्रवास आता शापयुक्त खोक्याच्या वेदनामय रस्त्याने जाईल.
आता खोक्या बाहेर आल्यावर धस _ मुंडे _ फुंडे सगळ्यांना सोडून मनसे जॉईन करणार आहे. कारण पोलिसांनी मुश्क्या आवळून त्याला परत आणण्याच्या बातम्या बघितल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याला विमानातून आणले आहे आणि ते आणताना त्याच्या हातात त्याच्या हाय प्रोफाईल मोबाईलवर त्याने राज ठाकरे यांचे ‘ गंगा नहाये ‘ बाबतची मिमिक्री पाहिली आहे. आता केवळ राज ठाकरे यांच्यावरच विश्वास राहिला आहे !!
जय गंगे | नमामि गंगे ||
– अनिरुद्ध बाळासाहेब बडवे
anirudhabadave@gmail.com