बालगंधर्व परिवाराचा ’जीवनगौरव’ ज्योती चांदेकर यांना प्रदान

प्लीज, आमचं बालगंधर्व पाडू नका. आमच्या काळात आम्ही इथे सोन्याचे दिवस पाहिलेत. पण आज अनेकांनी सोशल मीडियामध्ये बालगंधर्वची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले, तेव्हा खंत वाटली. की ज्या नाट्य मंदिराला आम्ही मंदिर मानतो त्यांचे भग्न अवशेष आम्हाला बघायला लावू नका, अशी आर्त विनवणी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी आज पुणे महापालिकेकडे केली.

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त २५ ते २७ जूनदरम्यान ’बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना ’जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्योती चांदेकर बोलत होत्या. यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संजय चोरडिया, म. न. पा. उपायुक्त संतोष वारुळे, वन ओटीटी प्लॅटफॉर्मचे संचालक विनायक सातपुते, चेतन मनियार, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, राष्ट्रसंचारचे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी व सभासद मान्यवर उपस्थित होते. ज्योती चांदेकर म्हणाल्या, आमच्या नाटकांच्या दौर्‍यांची सुरुवात इथेच व्हायची आणि समारोपही. आम्हाला ही वास्तू पाडू नये, असे वाटते, तसेच ती सुंदर असावी, असेही वाटते.

कारण आम्ही येथे रसिकांची करमणूक करायला येतो. पण तीच वास्तू अस्वच्छ असेल, तर त्याचा परिणाम आमच्या सादरीकरणावरही होतो आणि आमच्यावरही होतो. बालगंधर्वांची शान ठेवणे हे आता तुमच्या हातात आहे. आम्हाला पुन्हा तीच शान आणि वैभव येथे अनुभवायला मिळावी, ही अपेक्षाही ज्योती चांदेकर यांनी यावेळी व्यक्त केली. दै. राष्ट्रसंचारच्यावतीने भूमिका स्पष्ट करताना दै. राष्ट्रसंचारचे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त रंगमंदिरात उपस्थित राहणार्‍यांना फक्त ५४ रुपयांत वर्षभर अंक पोहोच करणार आहोत. तसेच कलाकारांसाठी दै. राष्ट्रसंचार माध्यमातून विमा उतरविणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. पंढरपूर दै. पंढरी संचारच्या साप्ताहिकाने सुरुवात झाली त्यानंतर दैनिकात रुपांतर झाले. जवळ जवळ या वृत्तपत्राला ५० वर्षे पुर्ण झाली. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून पुण्यात दै. राष्ट्रसंचार हे वृत्तपत्र सुरू केले आणि याला अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. आमच्या या वृत्तपत्राला पुणेकरांनी पसंती दिली असल्याचे यावेेळी आवर्जून सांगितले.

बालगंधर्व रंगमंदिराविषयीच्या आठवणी सांगताना ज्योती चांदेकर म्हणाल्या, बालगंधर्व ही पुण्याची शान आणि आमच्या कलाकारांचा अभिमान त्यांच्या नावाने ५४ वा बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव सुरू असल्याचा अभिमान वाटतो. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मी बालगंधर्व येथून केली आहे. बालगंधर्वमध्ये प्रयोग करायचा, म्हणजे दडपण असायचे, पण हा मखमली पडदा दूर झाला आणि प्रेक्षकांची दाद मिळाली, की सगळे दडपण गुल व्हायचे. आज इथे आल्यावर येथे केलेले सर्व नाटकाचे प्रयोग डोळ्यासमोर उभे राहिले. अनेक कटू, गोड आठवणी ताज्या झाल्या. इथे सलग प्रयोग असल्यास थोड्या वेळात पिलेला चहा, बटाटेवडा अगदी सगळे. यावेळी मानपत्राचे वाचन अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश सुपेकर आणि आभार शोभा कुलकर्णी यांनी मानले.

राष्ट्रसंचारचे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे

Nilam: