भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीर २०० रुपये जुडी

नाशिक : सर्व भाज्यांमध्ये वापरली जाणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये ‘भाव’ खात असून सोन्याच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले असून कोथिंबिरीची जुडी सुमारे २०० रुपयांना विकली जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव मात्र चढेच आहेत. सर्व भाज्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या कोथिंबिरीने उच्चांक गाठला आहे. सणासुदीच्या काळात कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली आहे.

भाज्यांचे वाढलेले दर

अद्रक ८० रु. किलो
लवंगी मिरची १०० किलो
शेवगा ७० रु. किलो
ढेमसे ६० रु. किलो
काकडी ५५० रु. कॅरेट
टोमॅटो ११०० रु. कॅरेट
कोबी २०० रु. कॅरेट
कोथिंबीर २०० रु. जुडी
कारले ५० रु. किलो
भोपळा ३०० रु. कॅरेट
फ्लॉवर १५० रु. कॅरेट

आवक घटल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सुमारे १६० रुपये जुडी मिळत असून कोथिंबीरीची जुडी २०० रुपयांना बाजारात विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र फटका बसत आहे.

शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमित आवकेच्या सुमारे ५० ते ६० टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर २० किंवा ३० रुपये पावशेरपासून सुरु होऊन १२० ते १६० रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर दिसत असल्याने मुलांच्या डब्यात काय द्यायचे असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.

मागील तीन-चार दिवसांपासून कोथिंबीर आवक घटल्याने कोथिंबीर जुडीला सोन्याचा भाव मिळत आहे. त्याचबरोबर इतर भाजीपाला दर देखील वाढले आहेत. पितृपक्षात भाजीपाला आवक कमी होती म्हणून भाव वाढले होते. आता मात्र सगळाच भाजीपाला महाग झाल्याचे भाजी विक्रेते सांगत होते.

Prakash Harale: