शेवगा, मिरची, काकडी, घेवडा, मटारच्या दरात घट
गेले काही दिवस झाले राज्यभर पावसाची रिपरिप झाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी तर शेती पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. दरम्यान, सध्या पावसाने उघडीप घेतली असल्याचे दिसते. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली असल्याचे दिसत आहे.
हिरवी मिरची, काकडी, घेवडा, शेवगा, मटारच्या दरात घट झाली आहे. तसेच कोबी, फ्लॉवरच्या दरात वाढ झाली. इतर फळे आणि भाज्यांचे दर स्थिर आहेत. टोमॅटो, लसूण, आल्याच्या दरात वाढ होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डात राज्य, परराज्यांतून शंभर ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे.
गुजरात, कर्नाटकमधून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून २ ते ३ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून १ टेम्पो मटार, २ ते ३ टेम्पो पावटा, गुजरात, कर्नाटकातून मिळून प्रत्येकी १ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ९ ते १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाल्याची माहिती प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली आहे.
‘या’ भाज्यांची झाली आवक
पुणे विभागामधून सातारी आले ७०० ते ८०० गोणी, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, मटार ३ ते ४ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग, ५० ते ६० गोणी, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक अशी आवक झाली असल्याची माहिती आहे.
घाऊक बाजारात कोथिंबीर- ६०० ते १००० रुपये, मेथी- ६०० ते ८०० रुपये, शेपू- ६०० ते ७०० रुपये, कांदापात- ८०० ते १२०० रुपये, चाकवत- ४०० ते ७०० रुपये, करडई- ३०० ते ६०० रुपये, मुळा- ४०० ते १२०० रुपये, राजगिरा-४०० ते ७०० रुपये, चुका-५०० ते ७०० रुपये, चवळई- ३०० ते ६०० रुपये, पालक- ६०० ते १५०० रुपये दर असल्याची माहिती आहे.