पुण्यात पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याची काही वैशिष्ट्ये किंवा अडचणीत येणारे विचार मनात येणे साहजिक आहेत. यातला पहिला मुद्दा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्याचा निर्णय.
सुंभ जळला तरी पीळ जळत नाही,’ असा एक वाक्प्रचार आपल्या माय मराठीत आहे. वारंवार एखाद्या विचार, कृतीचा अनुभव आला की, अशा प्रकारच्या वाक्प्रचार, म्हणींचा उगम होतो. या वाक्प्रचाराची आठवण होण्याचे कारण म्हणजे पुण्यात (Pune) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याची काही वैशिष्ट्ये किंवा अडचणीत येणारे विचार मनात येणे साहजिक आहेत.
यातला पहिला मुद्दा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्याचा निर्णय. विश्वस्त मंडळ, जे पुरस्कार देण्याची शिफारस करतात ते बहुतेक काँग्रेसी विचारसरणीचे आहेत. त्यांनी मोदी यांना पुरस्कार देण्यासंदर्भात एकमताने निर्णय का घ्यावा? सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत असताना पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय? काँग्रेसच्या भूतपूर्व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत उपस्थित केलेला मुद्दा, पंतप्रधानांना एकमताने पुरस्कार देण्याची केलेली शिफारस केलेल्या काँग्रेसजनांवर कारवाई करण्याची केलेली मागणी एकार्थी योग्यच आहे. सुशीलकुमार शिंदे या मुद्यावर मौन पाळतात, तर प्रणीती शिंदे उत्तर देत नाहीत. याचा अर्थ भिडचेपी, पोचट, दुटप्पी भूमिका घेण्याची त्यांची वृत्ती अधोरेखित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ते शेवटचा केसरी जयंतराव टिळक वगळता दीपक टिळक, रोहित टिळक यांचे कर्तृत्व ना काँग्रेसमध्ये कधी दिसले ना कधी शिक्षणक्षेत्रात! रोहित टिळक यांच्याबद्दल कोणी लिहून जागा व शाई वाया घालवावी अशी परिस्थिती नाही.
लोकमान्यांची पुण्याई एवढं संचित वगळता डॉ. दीपक टिळक यांच्या खात्यात संचित जवळपास शून्यच आहे. मोठमोठ्या, महनीय व्यक्तींना पुरस्कार देऊन आपली पत वाढवणे एवढे वर्षभराचे कार्य ही टिळक मंडळी करतात. अशा परिस्थितीत आणि दुसरीकडे मणिपूरसह अनेक विषयांवर पंतप्रधान मोदी यांना टोकाचा विरोध करीत असताना, होत असताना शरद पवार कोणत्या विचारांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होतात? बरं कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी ठरला होता, असं लंगडे समर्थन केले जात असले तरी, २०१४ सालापासून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात वैचारिक विरोध स्पष्ट आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तो तीव्र झाला तर शिंदे गट, पवार गटाच्या फुटीपासून तो तीव्रतम झाला. शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदी बसवलेल्या उद्धव ठाकरे यांना पदच्युत करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करणे ही ठाकरे यांची हार नव्हती, तर शरद पवार यांच्या सणसणीत पराभवाचा अध्याय होता. एक वेळ त्यांना काय घडणार हे माहीत असण्याची शक्यता, खात्री होती, पण घडणारे केवळ हतबल होऊन पाहाण्यापलीकडे त्यांच्या हातात होते काय? स्वतःच्या राजीनामानाट्यात स्वतः अडकण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यात घर फुटलं, पक्ष फुटला, अदानी यांच्या तीन भेटींनंतर भाजप विरोधातला सूर मंदावला.
आता थेट शरणागती पत्करणे शक्य नसल्याने विरोधाचा भाजप एक साधा मुखवटा धारण करावा लागणार आहे. लागतो आहे. लोकसभेत कायम उत्तम चर्चा करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या सुप्रिया सुळेही एक मणिपूरच्या मुद्यावर शांत आहेत. कोणत्याही क्षणी राजकारण आवळले जाण्याची शक्यता सत्यात उतरू शकते हे वास्तव पवार कुटुंबीयांना नक्कीच माहिती आहे.