पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आज इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 (IMC 2024) चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना तंत्रज्ञानाच्या जगात भारताच्या कामगिरीबद्दल सांगितले.
“आज भारत दर्जेदार सेवेवर लक्ष केंद्रित करत आहे. भारत जगाला संघर्षातून बाहेर काढून जगाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. २१व्या शतकात भारताचा मोबाईल आणि टेलिकॉम प्रवास संपूर्ण जगासाठी आवडीचा विषय बनला आहे. सध्याच्या काळात भारतात १२० कोटी मोबाइल युजर्स आणि ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. आज भारतात दूरसंचार क्षेत्रात झालेली प्रगती अकल्पनीय आहे. आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे मोदी म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत डिजिटल इंडिया मोहिमेला मोठे यश
जेव्हा लोकल आणि ग्लोबल एकत्र येते, तेव्हा जगाला नवे लाभ मिळतात. टेलिकॉम आणि कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात भारताचे मॉडेल काहीसे वेगळे आहे. भारतात आम्ही दूरसंचार हे केवळ कनेक्टिव्हिटीचे माध्यम नाही तर समानता आणि संधीचे माध्यम बनवले आहे. आज हे माध्यम गाव आणि शहर, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यात मदत करत आहे. गेल्या दहा वर्षांत डिजिटल इंडिया मोहिमेला मोठे यश मिळाल्याचेही मोदींनी सांगितले.
मोदी म्हणाले, “मला आठवतंय, १० वर्षांपूर्वी मी जेव्हा भारताचं व्हिजन देशासमोर मांडत होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की, आम्हाला तुकड्या-तुकड्यांमध्ये फिरावं लागणार नाही, तर सर्वांगीण दृष्टीकोन ठेऊ. त्यानंतर आम्ही डिजिटल इंडियाचे चार स्तंभ तयार केले. उपकरणाची किंमत कमी असावी, डिजिटल कनेक्टिव्हिटी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे, डेटा प्रत्येकासाठी उपलब्ध असणे आवश्यक, डिजिटल प्रथम आमचे ध्येय असले पाहिजे, या चार खांबांवर आम्ही काम सुरू केले आणि त्याचे परिणामही आम्हाला मिळाले.”
पीएम मोदी पुढे म्हणाले, “स्मार्टफोन भारतात तयार केल्याशिवाय ते स्वस्त होऊ शकत नाहीत. 2014 मध्ये फक्त दोन मोबाइल उत्पादन युनिट्स होती, आज 200 पेक्षा जास्त आहेत. यापूर्वी, आम्ही बनवलेले बहुतेक फोन बाहेरचे होते. भारतात पूर्वीपेक्षा सहापट अधिक मोबाइल फोन बनवले आहे, आम्ही चिपपासून ते तयार उत्पादनांपर्यंत भारतातील फोन पुरवण्यात गुंतलो आहोत.”
6G तंत्रज्ञानावरही वेगाने काम सुरू
दोन वर्षांपूर्वी आम्ही भारतात 5G सेवा सुरू केली. आज भारतातील जवळपास प्रत्येक जिल्हा 5G सेवेशी जोडलेला आहे. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G बाजारपेठ बनला आहे आणि आता आम्ही 6G तंत्रज्ञानावरही वेगाने काम करत आहोत. या सर्व प्रयत्नांना डिजिटल फर्स्टच्या भावनेने एक नवीन स्तरावर नेत आहे,” असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.