पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ विशेष कार्यक्रम जानेवारीत

पुणे : विद्यार्थ्यांचा परिक्षेचा ताण कमी करण्यासाठी आता पंतप्रधान (PM) यांनी पुढाकार घेवून अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी (Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा हा विशेष कार्यक्रम जानेवारी महिन्यात नवी दिल्लीतील टाऊन हॉल भारत मंडपम येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनोबल वृद्धिंगत करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी बहुपर्यायी ऑनलाइन स्पर्धात्मक परीक्षा https://innovateindia1.mygov.in/ या संकेतस्थळावर सुरू झाली असून, १४ जानेवारीपर्यंत ती सुरू राहणार आहे. यामध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी (Student), तसेच शिक्षक (Teachers)आणि पालक (Parents) सहभागी होऊ शकतात. या परीक्षेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पंतप्रधान यांच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये परीक्षेद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विचारण्यात आलेल्या निवडक प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे, तसेच मागील वर्षीच्या परीक्षे पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमामध्ये ज्या प्रश्नाचा समावेश केला होता, त्या प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्रसार माध्यमांसोबतच्या चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे.
परीक्षेविषयीची भीती कमी करून यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प, मॉड्यूल याविषयी प्रबंध सादर करणाऱ्या निवडक दहा शिक्षक विद्यार्थ्यांची एक्झाम वॉरियर (Exam Warriors) म्हणून निवड करण्यात येणार असून, त्यांना पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी कार्यक्रमाद्वारे झालेल्या फलनिष्पतीबाबतची माहिती सर्व विद्यार्थी व पालकांना दिली जाणार आहे. पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडिओ तयार करून प्रसिद्ध करण्यात यावी. सर्व अधिकारी व शाळाप्रमुखांची बैठक घेऊन सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संपत सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत.

Rashtra Sanchar Digital: