लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण लोकसभेच्या भाषणाचे कॉपी-पेस्ट होते. तीन त्रिक नऊचा पाढा त्यांनी यावेळी जनतेला सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण लोकसभेतल्या भाषणाची अक्षरशः पुनरावृत्ती होती. लोकसभेत त्यांनी या भाषणासाठी दोन तासांवर वेळ घेतला होता, तर लाल किल्ल्यावरून झालेल्या भाषणासाठी त्यांनी ९० मिनिटांचा कालावधी घेतला, मात्र भाषण लोकसभेतले कॉपी-पेस्ट होते.
खरे तर लोकसभेत एवढा वेळ भाषण केल्यानंतर लाल किल्ल्यावरील भाषण निम्म्यावर आणले असते तरी चालले असते. मात्र पंतप्रधानांना राष्ट्रीय व्यासपीठावर भाषण ठोकण्याचा मोह आवरला नाही. कॉपी-पेस्टमुळे भाषणातले मुद्दे साहजिकच तेच ते होते. हजारो कोटी रुपयांची आकडेवारी, लोककल्याणासाठी केलेल्या कामांची यादी, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाने केलेली प्रगती, विविध क्षेत्रांत झालेला विकास, त्यासाठी आपण देत असलेले योगदान याचा पाढा त्यांनी वाचला.
सर्वसाधारणपणे आजपर्यंत प्रत्येक पंतप्रधान आपल्या भाषणात देशाची गौरवशाली परंपरा, लक्ष्य पूर्ण केलेली बाजू सांगत असतात. त्या वर्षातल्या संकल्पना सिद्धीला गेल्याची माहिती देत असतात. पंतप्रधान मोदी यांनीदेखील तेच केले. त्यात नावे ठेवावे असे काहीच नाही. त्यातून पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय इंदिरा गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यानंतर सलग दहावेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान अशी नोंद मोदी यांची झाली. काँग्रेस वगळता इतर पक्षातले नरेंद्र मोदी हे अशी कामगिरी करणारे पहिलेच पंतप्रधान ठरले. यानंतर त्यांनी लोकसभेच्या २०२४ सालातल्या निवडणुकीत पुन्हा भाजपच सत्तेत येईल असे संकेत दिले. असे झाले तर त्यांची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर होईल. असा पराक्रम करू इच्छिणारे पंतप्रधान मोदी यांनी अनेक विषयांबरोबर लोकसभेत अविश्वास ठराव ज्यावेळी, ज्या कारणामुळे आणला गेला त्या मणिपूरचा उल्लेख करत शांततापूर्ण मार्गाने हा प्रश्न सोडवला जाईल असे स्पष्ट केले.
विरोधकांनी लोकसभेत यासंदर्भात अविश्वास ठराव एकतर आणायला नको होता किंवा पंतप्रधान मोदी यांनी तरी लोकसभेत केवळ काही मिनिटांचे भाषण करून लाल किल्ल्यावरून दोन तासांच्या भाषणांचा उपक्रम कायम ठेवायला पाहिजे होता. मात्र वर म्हटल्याप्रमाणे पंतप्रधानांना भाषणाचा मोह दोन्ही ठिकाणी आवरता आला नाही. पंतप्रधान यांनी नाव न घेता विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी तीन एके तीनचा पाढा आपल्या भाषणात कायम ठेवला. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यांनी नववर्षाच्या कारकिर्दीत आपण वाटचाल केली. प्रथम म्हणजे २०१४ सालात निवडून आल्यावर कामकाजाचे रिफॉर्म करण्यास प्रारंभ केला. तसा परफॉर्म केला आणि आज कारभारात बदल झाल्याने परिस्थिती ट्रान्सफॉर्म झाल्याचे दिसत आहे, असे ठासून सांगितले. या तीन सूत्रांनंतर त्यांनी विरोधकांवर टीका करीत परिवारवाद, भ्रष्टाचार आणि लांगुलचालन किंवा तुष्टीकरण या त्रिसूत्रींवर भर दिला. विशेषतः गांधी परिवार आणि काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचार, तसेच काँग्रेससह मित्र पक्षांनी अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचे केलेले लांगुलचालन, तुष्टीकरण यांना मोदी यांना अधोरेखित करायचे होते. गांधी घराणे यात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या धार्मिक थोतांडाकडे त्यांना अंगुलीनिर्देश करायचा होता. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धार्मिक मुद्द्यांवर तुष्टीकरण कसे केले गेले आणि त्याचा व्होट बँक म्हणून कसा वापर केला गेला, सत्ता मिळवणे यासाठी विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेसने परिवारवाद, भ्रष्टाचार व पुष्टीकरणाची विषवल्ली वाढवण्याचा प्रचारकी हल्ला मोदी यांनी केला.
मोदींची हमी या शब्दावर त्यांनी भाषणात जोर दिला. त्यांनी २०४७ सालात भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त देश विकसित देशांच्या रांगेत असेल आणि २०२४ नंतर पुढील पाच वर्षांत भारत जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती असेल, असा विश्वास दिला. हे सगळे युवक व महिलांच्या ताकदीवर करणार असून, डेमाॅक्रसी, डेमोग्राफी आणि डायव्हर्सिटी या गुणवैशिष्ट्यांनी करणार आहे, असे पुन्हा एकदा त्रिसूत्र मांडत स्पष्ट केले. लोकशाही व युवक, महिलांमधील गुणवत्ता, लोकसंख्येचा नियोजनपूर्वक वापर हे जागतिक महासत्ता बनवण्यासाठी त्रिसूत्र असेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मी पुन्हा येईन, हा अभििनवेशाचा भाग त्यांना कितपत साथ देणार, की फडणवीसांच्या उदाहरणावरून जनता त्यांना पुन्हा एकदा निवडून देणार हे औत्सुक्याचे ठरेल. एक मात्र सत्य आहे, मध्यमवर्गीय जनता महागाईने घाईकुतीला आलेली आहे आणि त्यांच्यासाठी केवळ हे शब्द म्हणजे पोकळ वारा आहेत.