कोल्हापूर | Prithviraj Chavan On Abdul Sattar – राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. यावरुन आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या आरोपानंतर अब्दुल सत्तारांवर काँग्रेसकडून टोलेबाजी सुरु झाली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरात बोलताना त्यांना टीईटी घोटाळ्याबद्दल विचारलं. यावेळी टीईटी घोटाळा प्रकरणी सत्तारांच्या मुलांची नावं समोर आल्याबाबत बोलताना चव्हाण यांनी म्हटलं आहे की, अब्दुल सत्तारांनाच आता हे शिक्षणमंत्री करतील. घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील. पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असंही ते म्हणाले.
पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलंय. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. देशात कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी सुद्धा फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जातं आहेत. नड्डा यांनी संकेत दिले आहेत कि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेला संपवून टाकायचं आहे. या आधी काँग्रेस मुक्त भारत घोषणा केली. चुकून दुसरं सरकार आलं तर ऑपरेशन लोटस वापरायचं अशी भाजपची खेळी आहे