इंदापूर : (Pro. Ram Shinde On Sharad Pawar) “मागील लोकसभा निवडणुकीत अमेठीचा किल्ला भाजपनं जसा सर केला तसा यंदा पवारांचा बारामतीचा किल्ला सर करणारच. २०१४ साली आम्ही अमेठीत हरलो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही २०१९ ला यश मिळवले. तेव्हा राहुल गांधींनी सुरक्षित वायनाड मतदारसंघ शोधला होता. आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा ‘वायनाड’ शोधावा असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदेंनी केलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे, यंदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते पुढच्या काही दिवसांत बारामती दौऱ्यावर येणार आहे. त्याच दौऱ्याच्या नियोजनासाठी प्रभारी राम शिंदे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर येथिल भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून दौऱ्याची सखोल माहिती दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्या बारामती लोकसभा मतदारसंघाची पाहणी करणार असून, शरद पवारांना बारामतीमध्ये घेरण्यासाठी नवीन व्यूव्हरचना आखणार आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढच्या दोन दिवसांत म्हणजे ६ तारखेला बारामतीच्या दौऱ्यावर असतील. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीचा बावनकुळे आढावा घेतील. २२ ते २४ सप्टेंबर रोजी निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर असणार आहेत.