प्राचीन भारतीय विज्ञान संशोधनातील समस्या

सतीश ब. कुलकर्णी

राष्ट्रसंचार’च्या विनंतीला होकार देऊन मी यावर्षी (२ जानेवारी, २०२२) पासून “प्राचीन भारतीय संस्कृतीतील विज्ञान” या विषयावरच्या ह्या लेखमालेला सुरुवात केली. या कालावधीत केवळ दोन रविवारांचा अपवाद करता प्रत्येक रविवारी एक लेख याप्रमाणे प्राचीन भारतातील ग्रंथांमधील प्रकट किंवा अप्रकट विज्ञानाची तोंडओळख वाचकांना व्हावी, या उद्देशाने मी लिहीत गेलो. ही लेखमाला वाचकांना कितपत आवडली असेल, याविषयी मी अनभिज्ञ आहे.

आधुनिक विज्ञानाचे स्पष्ट असे दोन प्रकार आहेत. एक ज्याला ‘हार्डसायन्स’ म्हणतात ते आणि दुसरे ‘सोशल सायन्स.’ हार्ड किंवा कोअर सायन्समध्ये प्रामुख्याने पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषिशास्त्र, गणित आणि सांख्यिकीशास्त्र आदी शास्त्रे येतात. दुसऱ्या प्रकारात, मानसशास्त्र, समाजविज्ञान आदी शास्त्रे मोडतात. पहिल्या प्रकारातील पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र अशा शास्त्रांचा पाया गणितशास्त्र आहे. किंबहुना, गणित ही या शास्त्रांची भाषा आहे, असे म्हणतात. पहिल्या प्रकारातील बहुतेक सर्व प्राचीन शास्त्रांचा परामर्श या लेखमालेत घेतला आहे. अर्थशास्त्र हा एक वेगळाच प्रकार आहे. गणित हाच अर्थशास्त्राचाही पाया आहे. प्राचीन भारतीयांनी अर्थशास्त्रातही भरीव प्रगती केली होती. कौटिल्याचा अर्थशास्त्रावरील ग्रंथ हा जगप्रसिद्ध आहे.

वर म्हटल्याप्रमाणे भारतातील प्राचीन ग्रंथांतील प्रकट आणि अप्रकट विज्ञानाची तोंडओळख करून देणे, हा या लेखमालेचा उद्देश आहेच. पण त्याचबरोबर, तरुण पिढीने या विषयांकडे वळून अधिक संशोधन करावे, हाही आहे. हे म्हणायला जितके सोपे आहे, तितकेच ते अंमलात आणणे, हे कठीण आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच या लेखात मी अशा संशोधनात येणाऱ्या समस्यांविषयी लिहिण्याचे ठरविले आहे.

१. तरुण पिढीची मानसिकता, ही माझ्या मते सर्वात मोठी समस्या आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे म्हटले तर या मानसिकतेला शे-दीडशे वर्षांचा आधार आहे. इंग्रजांचे राज्य असतानाच महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची आणि बुद्धिवादाची क्रांती व्हायला सुरुवात झाली. प्रामुख्याने अशी क्रांती भारतातील दोन राज्यांत प्रकर्षाने झाली. महाराष्ट्राबरोबर दुसरे राज्य म्हणजे पश्चिम बंगाल! इतर राज्ये त्यामानाने मागासलेली राहिलीत. त्या काळातील समाजातील विद्वान, बुद्धिवंतांवर इंग्रज राज्यकर्त्यांचा प्रभाव होता. सामाजिक स्वास्थ्यासाठी अशा क्रांतीची गरज होतीच. या क्रांतीमुळे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ हा विचार प्रबळ झाला. त्यामुळे जुन्या आचार-विचारांबरोबर आणि परंपरांबरोबर हजारो जुन्या ग्रंथांवरही संक्रांत आली आणि असे शेकडो, हजारो ग्रंथ एक तर अडगळीत पडले किंवा रद्दी म्हणून निकालात काढले गेले. भारतावर आतापर्यंत जी आक्रमणे झालीत त्यामध्ये मोठी आक्रमणे एक मुसलमानी आणि दुसरे इंग्रजांचे आक्रमण. मुसलमानांना पुस्तकांशी काही देणेघेणे नव्हते. त्यामुळे तक्षशीला किंवा नालंदासारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांची त्यांनी राखरांगोळी केली.पण इंग्रज धूर्त होते. आपल्या बुद्धिवान विद्वानांनी रद्दीत टाकलेले बरेच ग्रंथ त्यांनी पोत्यांमध्ये भरून मायदेशी रवाना केलेत. आजही युरोपातील अनेक देशांमधील पुस्तक संग्रहालयात असे शेकडो ग्रंथ जपून ठेवले आहेत. ‘प्राचीन ग्रंथ म्हणजे काल्पनिक देवदेवतांच्या स्तुतिप्रीत्यर्थ रचलेली आणि कर्मकांडात समाजाला अडकविण्यासाठी सांगितलेले पूजापाठ’ हा समज आजही आपल्या समाजात खोलवर रुजला आहे. याचे श्रेय इंग्रजांइतके आपल्या देशातील बुद्धिवादी विद्वानांकडेही जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात नव्याने निर्माण झालेल्या वैज्ञानिक समूहाने विज्ञान ही पाश्चिमात्यांनी भारताला दिलेली देणगी आहे, हा समज समाजात आणखी दृढमूल केला. अशा परिस्थितीत तरुण पिढीची मानसिकताही तशीच होणे, हे स्वाभाविकच आहे. ही मानसिकता बदलून आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये तत्कालीन देशांपेक्षा अधिक प्रगत विज्ञान आहे आणि या प्राचीन विज्ञानाच्या पायावर आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आपण या स्वदेशी विज्ञानाची एक समाजोपयोगी भव्य इमारत नव्हे, राजवाडा बांधू शकतो, हे या पिढीला समजावून सांगणे, हे मोठे आव्हान आहे.

२. प्राचीन ग्रंथांची सुलभ उपलब्धता, ही दुसरी महत्त्वाची समस्या आहे. तरुण पिढीतल्या काही थोड्या संशोधकांची मानसिकता बदलण्यात यश मिळाले तरी अशा ग्रंथांची संशोधनासाठी उपलब्धता असणे आवश्यक आहे. पण हा मोठा अडथळा आहे. सगळे वेद हे मौखिक परंपरेने जपले गेले, पण वेदांव्यतिरिक्त इतर वाङ््मय कालानुरूप नष्ट झाले असावे. याव्यतिरिक्त वर उल्लेख केल्याप्रमाणे मुसलमानी आक्रमणांमुळे किती मोठ्या संख्येत ग्रंथ नष्ट झाले, याची फक्त कल्पनाच करता येते. असे म्हणतात, की तक्षशीला विद्यापीठ जाळण्यात आले, तेव्हा या विद्यापीठाच्या ग्रंथ-संग्रहालयाला लागलेली आग विझायला पुरे दहा दिवस लागलेत. भारतभर या काळात आक्रमकांनी केलेल्या लुटमारीमध्ये आणि जाळपोळीमध्ये किती मौल्यवान ग्रंथ अग्नीच्या ज्वाळांमध्ये लपेटले गेले असतील, याचीही केवळ कल्पनाच करता येते. यानंतरच्या काळांत आलेल्या युरोपियन लुटारुंनी उरलेले शेकडो ग्रंथ एकतर नष्ट केले किंवा पळविले. त्यामुळे ग्रंथरुपी सागरावर आलेल्या या भयानक संकटानंतर केवळ मौखिक परंपरेने जपले गेलेले वेदवाङ्‌मय सोडून एखादाही मौल्यवान ग्रंथ आता शिल्लक राहिला नसेल, अशी आपली समजूत झाली असेल. पण तिला धक्का देणारी माहिती मी आता आपल्याला देणार आहे. अजूनही भारतातील अनेक नामांकित ग्रंथालयांमध्ये लाखोंच्या संख्येने प्राचीन ग्रंथ किंवा हस्तलिखिते जपून ठेवली आहेत. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर किंवा आनंदाश्रम यांसारख्या संस्थांमध्ये काही लाखांच्या संख्येने असे ग्रंथ किंवा हस्तलिखिते पाहायला मिळतील. तसेच बडोदा येथील ओरिएंटल लायब्ररी यासारख्या अनेक संस्थांनी लाखो पुस्तकांचे जतन करून ठेवले आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अशी पुरातन हस्तलिखिते गोळा करून त्यांचे एक रजिस्टर निर्माण करण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली आहे. सध्या पुण्यातच वास्तव्यास असणारे ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर काम केलेले डॉ. शंकर नेने यांनी या संस्थेची धुरा बरेच वर्षे सांभाळली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते जेव्हा या संस्थेतून निवृत्त झाले त्यावेळेपर्यंत या संस्थेने एक कोटी अडतीस लाख हस्तलिखितांची नोंद केली होती आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार, आज ह्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. म्हणजे ज्याला या विषयांवर संशोधन करण्याची इच्छा आहे, त्याला संशोधनासाठी आवश्यक असणारी सामग्री उपलब्ध आहे, असे म्हणता येईल. प्रश्न आहे तो, की विषयानुसार आवश्यक असणारे ग्रंथ किंवा हस्तलिखिते नेमकी कुठल्या ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध होतील, ही माहिती मात्र सहजपणे उपलब्ध होत नाही, हा आहे. त्यासाठी बहुतेक वेळा अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो, अनेक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध विद्वानांसंबंधी माहिती गोळा करावी लागते. अशा विद्वानांकडे खूप महत्त्वाची माहिती असू शकते.

३. संस्कृत भाषेचे ज्ञान ः बहुतेक प्राचीन ग्रंथ हे संस्कृत, पाली अशा भाषांमध्ये ग्रंथित केले असल्यामुळे या भाषांचे चांगले ज्ञान असणे, हे फायदेशीर असते. पण संस्कृत भाषेची आपण इतकी दुर्दशा करून ठेवली आहे, की संस्कृत शिकविणारे शिक्षकही हल्ली मिळणे दुरापास्त झाले आहे. आजच्या घडीला युरोपियन देश आणि अमेरिकेमध्ये कदाचित जास्त संख्येने संस्कृत शिक्षक मिळण्याची शक्यता आहे.कारण या देशांमध्ये अलिकडच्या काळात संस्कृत शिकण्याची जणू लाटच आली आहे. याबरोबरच आपण (प्राचीन असले तरी) विज्ञानाच्या क्षेत्रात काही संशोधन करायचे ठरविले असेल तर आपण आधुनिक विज्ञानक्षेत्रातही पारंगत असणे आवश्यक आहे.

४. आपण विज्ञानाच्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळविले असेल आणि आपल्याला संस्कृत भाषेचे जुजबी ज्ञान असले तरी आणखी एक अतिकठीण परीक्षा, (ज्याला हल्ली आपण एन्ट्रन्स एक्झाम म्हणतो, अशा तऱ्हेची एक परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता अजिबात नाही. ही परीक्षा म्हणजे, एका संस्कृत शब्दांचे अनेक अर्थ असू शकतात. यापैकी नेमका कुठला अर्थ आपल्याला वैज्ञानिक कार्यासाठी उपयुक्त आहे, हे समजणे. अनेक परदेशी विद्वानसुद्धा या परीक्षेत नापास झाले आहेत, म्हणून त्यांनी वेदांतील अनेक शब्दांचे भलतेच अर्थ लावून वेदांची यथेच्छ टिंगलटवाळी केली आहे.
या लेखमालेच्या अंतिम लेखात आपण याच वास्तव प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत.

Sumitra nalawade: