कोट्यवधींचा मलिदा व्यापाऱ्यांच्या घशात…

पुणे : सध्या देशातील बाजारात भेसळयुक्त वस्तू, पदार्थ अतिशय बिनधास्तपणे विकल्या जात आहेत. आरोग्यासाठी हानिकारक, धोकादायक असलेल्या अनेक वस्तूंची भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.

अशा भेसळयुक्त वस्तूंमुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय त्यांचे आरोग्यसुद्धा बिघडण्याचाही धोका अधिक असतो. अशा भेसळयुक्त वस्तूंच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा मलिदा (नफा) बहुतांश व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचे समोर आले आहे, तर नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) कठोर कारवाई अपेक्षित आहे.

बाजारात तूप, दुधाचे पदार्थ, तेल, खवा अशा खाद्यपदार्थांची मागणीत हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याचाचा गैरफायदा भेसळमाफियांबरोबरच काही व्यापारीसुद्धा घेत आहेत. या भेसळमाफियांनी सर्रास खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ भागात साडेचार लाख रुपयांचे १ हजार ४९९ किलो भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले होते. आताच्या कात्रजच्या कारवाईत १५० किलो भेसळयुक्त तूप, तर वडगाव शेरी परिसरात भेसळयुक्त तूप बनविणारा कारखान्यातून तब्बल ७५० लिटर भेसळयुक्त तूप आणि नाशिकच्या भेसळयुक्त फोर्टिफाइड तेलाच्या छाप्यात १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांच्या खाद्य तेलाचा साठा, इत्यादी कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा एफडीए विभागाकडून जप्त करण्यात आला. यावरून एकंदरीत बहुतांश व्यापाऱ्यांनी लाखाचा मलिदा घशात घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात चार कोटींची कारवाई

राज्यात एफडीएने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ४ कोटी १३ लाख ९१ हजार २११ रुपयांचे अन्नपदार्थ जप्त केले आहेत. विविध कारवाईत १३ लाख ८८ हजार ४६० रुपयांचा खवा-मावा जप्त केला आहे, तर ४९२ नमुने घेऊन ३ कोटी १३ लाख १० हजार ३६९ किमतीचे खाद्यतेल- वनस्पती तूप जप्त केले. त्याचबरोबर मिठाई-स्पेशल बर्फी आणि इतर खाद्यपदार्थांचे ८९९ नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. यातील ४ कोटींचा मलिदा खाणाऱ्या व्यापारांवर कारवाई झाली आहे.

राज्यात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. अशात घरात गोडधोड केले जाते. तसेच बाहेरूनही अनेकदा मिठाई मागवली जाते. अशा वेळी वनस्पती तूप घरात वापरणार असाल तर सावध व्हा. तसेच बाहेरून पदार्थ खरेदी करतानाही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) वेळोवेळी अशा प्रकारच्या भेसळयुक्त वस्तूंवर, गोदामांवर कारवाई करीत भेसळ करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण याला न जुमानता अनेक व्यापारी, दुकानदार बिनदिक्कतपणे भेसळ करतात आणि अशा विक्रीतून अधिक नफा कमावीत असतात. गेल्या आठवड्याभरापूर्वी वनस्पती तुपाच्या भेसळीच्या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष घालून घाऊक व्यापाऱ्याकडून तब्बल ७ लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त केले होते. यामध्ये लाखाचा मलिदा व्यापाऱ्यांनी घशात घातला असल्याचे दिसून आले.

अन्नपदार्थांत भेसळ केले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. होणारी भेसळ रोखण्यासाठी तपासणी नमुने घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रसंगी संशय असलेला माल जप्तही केला जात आहे. ग्राहकांनी खाद्यपदार्थांच्या खरेदीपूर्वीच मालाची खात्री करून स्वच्छता असलेल्या ठिकाणावरून माल घ्यावा. संबंधित व्यापारी अशा व्यवसायातून कोट्यवधी रुपयाची कमाईसुद्धा करीत आहेत. कुठेही भेसळ आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात.
— संजय नरगुडे, सहआयुक्त (अन्न विभाग)

व्यापाऱ्यांवर वचक गरजेचे : नफ्यासाठी खाद्यपदार्थांत भेसळ केली जाते. व्यापारी शिताफीने भेसळयुक्त तुपात ४० टक्के रिफाइंड तेल आणि ६० टक्के वनस्पती तूप मिसळतात. शहानिशा न करता नागरिकही तूप समजून खरेदी करीत असतात. भेसळयुक्त तुपाच्या विक्रीतून व्यापारी लाखांची माया जमवीत आहेत. संबंधित व्यापाऱ्यांवर कायमचे वचक बसावा, अशी मोहीम गरजेची आहे.

Dnyaneshwar: