नवी दिल्ली | World Athletics Championships 2022 – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. तसंच ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने 90.54 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं आहे.
युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं.
दरम्यान, ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने 90.54 मीटर अंतरावर भालाफेक करत पहिलं स्थान मिळवलं आहे. पहिल्या प्रयत्नात त्याने 90.21 मीटर आणि त्यानंतर 90.46 मीटर अंतरावर भाला फेकला होता. सहाव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकलं.