पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स

पुणे | पुण्यातून उन्हाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी मोठी असते. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी जात आहेत. मात्र, अयोध्या येथे जाण्यासाठी मर्यादित गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होत होती. पुण्यातील प्रवाशांना आयोध्येला जाता यावे यासाठी विशेष गाड्या असाव्या अशी मागणी प्रवाशांनी केली होती. या मागणीची दाखल घेत पुण्यातून अयोध्येला जाण्यासाठी ४ समर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

रेल्वेने हजारो भाविक अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्यादरम्यान अतिरिक्त चार उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-अयोध्या (ट्रेन क्रमांक ०१४५५) उन्हाळी विशेष गाडी पुण्याहून तीन आणि सात मे या दोन दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. ती तिसऱ्या दिवशी अयोध्येत सकाळी ८.५० वाजता पोहोचणार आहे. अयोध्या-पुणे (ट्रेन क्रमांक ०१४५६) उन्हाळी विशेष गाडी अयोध्येहून पाच मे आणि नऊ मे रोजी दुपारी चार वाजता सुटणार आहे. ती तिसऱ्या दिवशी पुण्यात दुपारी ३.५५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर आणि लखनौ या स्थानकांवर थांबे असणार आहेत.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते अजनीदरम्यान अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दोन मे रोजी पुण्याहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अजनीला पोहोचेल.

Rashtra Sanchar Digital: