पिंपरी : (Pune Crime News) संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचे सांगत आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत बँक व्यवस्थापकाकडून खंडणी उकळणा-या महिलेसह दोघांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली.
गणेश लक्ष्मण कोळी (वय २७, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, पुणे) याच्यासह त्याच्या साथीदार महिलेला अटक केली आहे. याबाबत भोसरी परिसरातील एका राष्ट्रीय बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला होता.
संभाषण समाज माध्यमावरील प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपींनी व्यवस्थापकाकडे अडीच लाखाची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर ‘तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू, नोकरी घालवू व संपवून टाकू’ अशीही धमकी दिली. त्यामुळे व्यवस्थापकाने सुरुवातीला २५ हजार रुपये दिले.
आरोपींनी आणखी दोन लाखाच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सापळा लावून तडजोड करण्यास सांगून दीड लाखाची खंडणी घेण्यासाठी आरोपींना बोलावत ताब्यात घेतले.