पिंपरी चिंचवड | विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी फेज 2 मध्ये घडली होती. त्याठिकाणी शनिवारी रात्री झालेल्या खुनाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलाला घेऊन जाऊ न दिल्याने मनात राग धरून पतीने पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नामदेव वाळूचंद राठोड (वय ४२) याला अटक करण्यात आली आहे. तर सविता नामदेव राठोड (वय ३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कमल गोपीचंद राठोड यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची मुलगी सविता नामदेव राठोड हिने पती नामदेव राठोड याला त्यांच्या मुलाला सांगली येथे त्यांच्या मूळगावी घेऊन जाण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी नामदेव याने पत्नी सविता हिला शनिवारी रात्री हिंजवडी येथे गाठले आणि तिच्या पोटात चाकू भोकसुन खून केला. यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला होता. हिंजवडी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे.