गुन्हेगारी ही एक चिंतेची बाब ठरली आहे. पुणे शहरात सातत्याने काळजाला थरकाप करणाऱ्या…माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. गुन्हेगारी थांबणार कधी? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न सतावतो. मोठ्या प्रमाणात तरुणाईची पावले गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. पुणे शहर, ग्रामीण भाग आणि पिंपरी चिंचवड शहरात बघायला गेलं तर जानेवारी २०२१ पासून ते सरत्या वर्षाअखेरपर्यंत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गल्लीबोळात टग्यांनी ठिकठिकाणी टोळक्यांचे घर केले आहे. हवं तसं कारणामे करून तरुणाई मोकाट झाली आहेत. जबरी चोरी, रस्ता लूट, खून, मारामारी, घरफोडी, खंडणी, महिला व मुलींवर होणारे अत्याचार, विनयभंग, बलात्कार अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. असे गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांचा धाक नाही का?
विनोद आवळे | क्राईम वॉच |
समाजात झेपावणाऱ्या विकृतीमुळे पुरोगामी महाराष्ट्रात मुलींमध्ये, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. काळजाचा थरकाप करणाऱ्या अशा घटना घडल्याने आंदोलने, मोर्चे निघतात. आरोपींना शिक्षा व्हावी, अशा मागण्याही केल्या जातात. पण एवढ्याने जबाबदारी संपेल का? म्हणतात ना.. येरे माझ्या मागल्या, असं सुरूच राहिल, हे निश्चित. गंभीर कारनामे करत साथीदारांच्या जीवावर समाजात दहशतीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मधील काळात एकीकडे माणसाला कोरोनाची धास्ती होती. तर दुसरीकडे गुन्हेगारीतील दहशतीचीही धास्ती होती. वाढती गुन्हेगारी पाहता समाजातील सर्वच घटकांना दहशतीची बाधा तर होणार नाही, असाही प्रश्न पडतो.
मागील काही वर्षांपासून पुण्यात लोकसंख्येची वाढ झपाट्याने झाली. रोजगाराच्या संधी असल्याने शहरीकरण होते, हे माहितीच आहे. तर लोकसंख्या वाढली की महानगरच… ग्रामीण भागाकडून शिक्षण, रोजगारासाठी येणाऱ्यांचा कल मोठा आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी शहरात पाहायला मिळते. मात्र त्या वाढत्या शहरीकरणाने वाईट घटनाही तितक्याच समोर येताना दिसतात.
एक वर्ष झाले शहरात घरफोडीचे प्रमाण खूप वाढले आहे. बंद फ्लॅट फोडणे ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणीच ठरताना दिसते. घरफोडीसाठी अनेक आधुनिक शस्त्र चोरट्यांकडून वापरले जात आहे. घरावर पाळत ठेवून रात्री आणि दिवसाही घरफोडीचे प्रकार बळावत आहे. चोरीच्या घटना या तर नित्याच्याच आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात वाढही होताना दिसते. अशा घटनेने सामान्यांच्या जीवनावर परिणाम होतोय. शहरात अनेकवेळा दिवसाढवळ्या घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जबरी चोरी, घरफोडी यासारख्या घटना नागरिकांना मोठा हादरा देणारे ठरतात. अनेकांची मालमत्ता गमावल्याने त्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होतो. अशा घटना घडू नयेत त्यासाठी पोलिसांनी कारभार हाकणे गरजेचे असले तरी समाजानेही याकडे लक्ष्य देणे अत्यंत आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यात खून, हत्यांची बाब तर राजरोजपणे, दिवसाढवळ्या होताना दिसत आहे. अशा घटनाप्रकारात तरूणाईचाच वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळतो. समाजात दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या टोळक्यांची गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचा दिसते. असे असताना दुसरीकडे कुटुंबातील वाद देखील उफाळला आहे. या वादाची सगळी घटना जीवनयात्रा संपवण्याकडे असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते.
वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेमध्ये तरुणाईचा वर्ग मोठा आहे, हे तर नक्कीच. आपली प्रतिमा, आपलीच दादागिरी आणि आपलंच साम्राज्य म्हणत, दुसऱ्यांच्या जीवावर अनेक किरकोळ ते मोठ्या कारणांपासून एखाद्याचा जीव घेण्यात ही भाई मंडळी तरबेज झाली आहेत. पुण्यातल्या अनेक उपनगरांत स्वताला भाई म्हणवणारे लिंबू टिंबू उदयास आले आहे. शिक्षणाचा अभाव, हाताला काम नाही, चार पैसे कमवून खाण्यापेक्षा उलाढाली केलेली बरी, म्हणायला गेलं तर असा एक निर्धारच करून तरुणपिढी गुन्हेगारीकडे सहजतेने वळताना दिसते.
जिल्ह्यात गल्लीबोळात गुन्हे होताना सहजतेने दिसत आहे. हे रोखण्यासाठी कायदे करण्यात आले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि त्यांना दंडित करण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आल्या. अनेक युगांपासूनच हे चालूच आहे. म्हणजेच ‘चुका करणे हे मनुष्याच्या प्रकृतीमध्ये आहे’, असे म्हणावे लागेल. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करतेय. पण त्याचबरोबर समाजानेही गुन्हेगारीला थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना किंवा प्रयत्न केला पाहिजे, हे नक्कीच. कारण वाढती गुन्हेगारी आणि खरंतर तरुणाईमध्ये सतत वाढणारी गुन्हेगारी, हे काही फक्त आणि फक्त पोलीसच थांबवू शकते, असं नाही. गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलेली तरुणाई कशी सोडवता येईल, याकडे समाजानेही पाहणे गरजेचे आहे.
समजा एखाद्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी म्हणून एखाद्याला चौकशीसाठी पोलिसांनी अटक केली तर पोलीस अधिकार्यांना राजकीय नेत्यांच्या दबावाला सामोरे जावे लागते. दखलपात्र गुन्हा असून देखील अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करून गुन्हेगारांना, आरोपीला मोकळीक द्यावी लागते. अशी परिस्थिती उद्भवते, त्यावेळी पोलिसांना कायदा बाजूला ठेवून आपल्या कर्तव्यदक्षतेला मुरड घालून दबावाला बळी पडावे लागते, म्हणून त्यांना पूर्ण दोषीही धरता येणार नाही. प्रामाणिकपणे काम करणारे पोलीसही आहेत. कायद्याला धरून वागणे हेच ध्येय मानून वेळप्रसंगी राजकीय दबाव धुडकावून देतात. म्हणून अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना सतत बदली होणे, सरकारकडून सतावणूक होणे, अशा संकटांना सामोरेही जावे लागते हे वास्तव आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी आज पालक लहानपणापासून आवश्यक संस्कार करत नाहीत. शालेय शिक्षणाच्या काळात शिक्षकांची पिढी कमी करण्यात कमी पडतात, तर महाविद्यालयीन मुक्त जीवनात विद्यार्थ्यांवर कोणीही लगाम घालू शकत नाही. अशी एकूणच सामाजिक परिस्थिती आहे. आणि ती बदलण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गुन्हेगारी वाढू नये यासाठी शासन व पोलीस यंत्रणा सक्षम असायला हवी. तसेच, गुन्हेगारीचे बीज पेरले जाणार नाही म्हणून प्रभावी संस्कार देणारे कार्यक्षम पालक, शिक्षक आणि इतर सामाजिक घटक असणे अधिक महत्त्वाचे आहे. याबाबत जागरुकता आणि सामाजिक भान असल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकते,
मागील दोन वर्षापासून पुणे जिल्ह्यात अनेक संघटित गुन्हेगारीवर मावळत्या पुणे पोलीस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी ११० हून अधिक टोळ्यांवर मोक्का लावला. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आयुक्तांनी संघटीत टोळींवर गुन्हा दाखल करून कारवाईही केली. असे करुन देखील रोज नव्या टोळक्या निर्माण होऊन समाजात दहशतीचे साम्राज्य पसरवण्याचे काम करताना दिसतात. यावरून असं वाटणं साहजिक आहे की, गुन्हेगारी संपायचं अथवा कमी व्हायचं नाव घेत नाही. एकीकडे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असला तरी दुसरीकडे नव्याने खुलेआम गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. हे पाहता काहीतरी गणित चुकते का? आणि हे गणित सुटणार कसे? याकडेही पाहणे गरजेचं आहे. गुन्हेगारांना गुन्हेगारीची एक सवयच लागून गेलीय, पण ती सवय थांबणार कधी? थांबवणार कोण? हाच मुळात प्रश्न आहे. पोलिसांची कारवाई तर होतेच हे नक्की, पण गुन्हेगारी कमी होण्यास किंबहुना त्यावर कायदेशीर उपाययोजना सूचवणे तसेच त्यावर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे हेही तितकेच महत्त्वाचे..
कोयता गँग
पसरवतेय दहशत…
पुणे शहरात कोयता गॅंगच्या दहशतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. रोज शहरात राजरोजपणे दहशत निर्माण होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दहशत पसरवली आहे. दारु पिऊन कोयते घेऊन नागरिकांच्या अंगावर गेले होते. यावर आवर कधी, हाच प्रश्न पुणेकरांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच सिंहगड लॉ कॉलेज रोडवर दोन तरुणांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना भोसकले होते. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना पाठलाग करुन पकडले, या गुुन्हेगारीच्या विळख्यात सर्रासपणे अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.
मोकाट कोयता गॅंगवर ‘मोक्का’ लागणार?
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. काही जणांच्या पोलिसांनी मुसक्या देखील आवळल्या आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कोयता गॅंगच्या दहशतीचा प्रश्न गाजला होता. या कोयता गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई करा किंवा तडीपार करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी पहारा देण्यास सुरुवात केली होती. मात्र ही गॅंग शहरातील सगळ्याच परिसरात सक्रिय झाली असल्याने पुणे पोलिसांना या गॅंगवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पुण्याचे नवे पोलिस आयुक्तही आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दहशत निर्माण करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मोक्का आणि एमपीडीए कायद्यान्वये सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मागील सहा वर्षात परिसरात दहशत निर्माण करणार्यांची यादी काढून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पोलिसांचा अॅक्शन प्लॅन कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.