अध्यात्म, विज्ञान व सामाजिक संवादाची जोड
नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यातील अनेकांची मुले बाहेर असल्याने एकाकीपण येते आहे. त्यातून संवाद होत नाही. नैराश्य येते. अशावेळी हास्यक्लब उपयुक्त ठरतील. संवादाचे, भावनिक नाते निर्माण होऊन या लोकांनाही आनंदयात्री होता येऊ शकते. हास्य क्लबच्या सदस्यांनी यात पुढाकार घेऊन अशा आजीआजोबांना भावनिक आधार देण्याचे करावे, असे डॉ. रामचंद्र देखणे यांनी सूचित केले.
पुणे : “विनोदी लेखन ही अभिव्यक्ती, तर हास्य ही अनुभूती आहे. विनोदाचे मूळ दुःखात असून, हसण्यामुळे अप्रिय दुःखाचे विस्मरण होते. प्रत्येक विनोदात तत्त्वचिंतन असते. त्यातून फुलणारे हास्य माणसाला अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीच्या द्वंद्वापलीकडे घेऊन जाते. अध्यात्म, विज्ञान आणि सामाजिक संवादाची जोड असलेला हास्ययोग आपण नियमित केला पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.
हास्य चळवळीमुळे हास्ययोगाचे माहेरघर अशीही ओळख आता पुण्याला मिळाली असल्याचे ते म्हणाले. नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी मेळाव्याचे उद्घाटन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यात क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. हिमांशु वझे, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी आदी उपस्थित होते.
८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तसेच २५ वर्षाच्या हास्य चळवळीच्या कार्याबद्दल सुमन व विठ्ठल काटे यांचा सत्कार करण्यात आला. उषा महाजन व निवृत्त न्यायाधीश जगदीश लिमये या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. चंदन भिडे व सहकाऱ्यांनी गणेशवंदना सादर केली. सुमन व विठ्ठल काटे यांनी विविध हास्यप्रकार घेत सभागृहात नवचैतन्य फुलवले.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “हास्याची दिंडी घेऊन हास्य क्लबच्या माध्यमातून वैष्णवांचा मेळा भरवणा विठ्ठल म्हणजे विठ्ठल काटे आहेत. हास्य आणि विनोद ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. अध्यात्म, संत साहित्यातही हसण्याला प्राधान्य दिले आहे. ज्ञानोबा-तुकोबा पासून ते आचार्य अत्रे, पुलं देशपांडे यांच्यापर्यंत खळखळून हसवणारे साहित्य निर्माण झाले आहे. त्यातून नकळत तत्त्वज्ञानही उद्धृत होते.”
डॉ. हिमांशु वझे म्हणाले, “चित्ताची साम्य अवस्था टिकवण्याचे काम हास्य करते. हसणे हा शंभर नंबरी सोन्यासारखा अलंकार ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आहार, विहार आणि आनंदी जगणे आपल्या आरोग्याला संतुलित ठेवेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी हास्ययोग प्रभावशाली असून, त्याला वैज्ञानिक आधार आहे.सशक्त भारताचे नागरिक सशक्त राहायला हवेत. कोरोना काळात मकरंद टिल्लू यांनी ही हास्ययोग चळवळ ऑनलाइन सुरू केली. सूत्रसंचालन राजवळ यांनी केले.