पुणे : चीनमध्ये थैमान घालत असलेला HMPV व्हायरस चा भारतात दाखल झाला आहे. देशात त्याचे काही रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान पुण्यातील लोहगाव विमानतळावर ज्या ठिकाणी देशातून आणि विदेशातून अनेक नागरिक ये जा करत असतात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे.या व्हायरसविरूद्ध पुणे महानगरपालिका सतर्क असून पुणे महानगरपालिकेने ५० बेडचे विलगीकरण कक्ष तयार केला आहे. मात्र पुणे विमानतळ प्रशासनाला अजून कुठलेही अलर्ट आलं नसल्याने या ठिकाणी तपासणी होत नाही. पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाची बैठक झाली. मात्र लोहगाव विमानतळावर प्रवाशाची तपासणी सुरू केलेली नाही. याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल अस महापालिका अधिकारी यांनी सांगितलं आहे.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोरोडे यांनी सांगितलं की, विमानतळावर अद्याप महापालिकेनं स्क्रीनिंग किंवा तपासणी सुरु केलेली नाही. राज्य सरकारच्या सुचनेनुसार विमानतळावर स्क्रीनिंग सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण लहान मुलांना सहज होत नव्हती मात्र या विषाणूची लागण लहान मुलांनाही होताना दिसते. हा विषाणू २००१ मध्येच नेदरलँडमध्ये आढळून आला होता.