पुणे | राज्यातील तापमान दोन दिवसांपासून स्थिर आहे. तापमान 40 अंश सेल्सियसच्या आत राहिले आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30-40 किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. दरम्यान, आज पुण्यात सकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहरातील कोथरूड परिसर, हडपसर, मांजरी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला.
पुणे ऑरेंज अलर्ट जारी
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान सुरु आहे. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. यामुळे मतदारांची तारांबळ उडाली. पावसाचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील हडपसर ,स्वारगेट, कात्रज या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.