पुण्यातील वाघाची गुवाहाटीत डरकाळी

प्राणी संग्रहालयात लवकरच रानमांजर आणि वाघाडी मांजरांची होणार एन्ट्री

पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जन्माला आलेल्या वाघ गुवाहाटीमधील प्राणीसंग्रहालयात डरकाळी फोडणार आहे. तर त्या प्राणी संग्रहालयातून पुण्यात रानमांजर आणि वाघाडी मांजराची जोडी आणण्यात येणार आहे. त्याबाबत दोन्ही प्राणी संग्रहालयांत चर्चा सुरू असून, त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. प्राणी हस्तांतरण उपक्रमांतर्गत ही प्राण्याची आदलाबदल केली जाणार आहे.

स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सहा पट्टेरी वाघ आहेत. या संग्रहालयात असलेल्या वाघाच्या जोडप्याला तीन बछडे झाले असून, ते साडेतीन ते चार वर्षांचे आहेत. त्यामुळे यातील काही वाघ प्राणी हस्तांतरण उपक्रमांतर्गत गुवाहाटी येथील प्राणी संग्रहालयास दिले जाणार आहेत. त्या बदल्यात पालिका वाघाटी मांजर आणणार आहे.

संग्रहालयात सध्या महापालिकेने या मांजरांसाठी स्वतंत्र पिंजरे उभारले असून, त्यात दोन मांजरे आहेत. आता त्यांची संख्या वाढविली जाणार आहे. प्राणी हस्तांतरण उपक्रमांतर्गत महापालिकेने नुकतेच तिरूअंनतपुरम येथून दोन रानगवे आणि दोन तरस आणले असून, त्या बदल्यात संबंधित प्राणी संग्रहालयास दोन भेकर तसेच एक अफ्रिकन पोपट देण्यात आला आहे.

प्राणी संग्रहालायत महापालिकेकडून दोन पट्टेरी तरस लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात हे तरस पुणे जिल्ह्यातही आढळतात. मात्र, अद्यापपर्यंत प्राणी संग्रहालयात ते नव्हते. त्यामुळे पुढील महिन्याभरात या तरसांच्या खंदकांचे काम पूर्ण करून ते पर्यटकांसाठी खुले केले जाणार असल्याचे प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक राजकुमार जाधव यांनी सांगितले.

Prakash Harale: