पुणे : येरवडा भागातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच त्याचा धक्का बसल्याने त्या मुलीच्या नियोजित वराने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पीडित मृत मुलीची आई व बहिण मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमितून गायब झाल्याने तपास यंत्रणेसह पुणेकरांना धक्का बसला आहे. पोलिसांपुढे या प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान असून, सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा आता प्रकर्षाने सामोरा येईल.
दरम्यान, मुलीच्या खुनाचा तपास लागलाच पाहिजे, अशी मागणी करून प्रकरणाच्या निषेधार्थ वडार समाजाच्या वतीने येरवडा पोलीस स्टेशनला घेराव घालण्यात आला. पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
विधी मंडळात पडसाद उमटणार :
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पहाता यावर अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आवाज उठविला नसता तर प्रकरण दाबून टाकले असते. समाज बांधवांनी आवाज उठवून लढा देण्याची गरज असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी वडार पँथर संघटनेचे दयानंद इरकल यांनी केली.
या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलगी ही खराळवाडी परिसरात राहत होती. मृत पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी रात्री १०च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती पीडितेस बुलेटवरून घेऊन गेला होता. मात्र, रात्री दोनच्या सुमारास पीडितेची बहीण व आईस शास्त्रीनगर येथील एका खासगी रुग्णालयातून, तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले असून, तिने हाताची शिर कापली आहे, असा फोन आला. यावेळेस मयताची आई, बहीण व चुलती रुग्णालयात तातडीने पोहोचले.
नंतर तिला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळेस अनोळखी व्यक्तीने पीडित मुलीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सांगितल्यावर डॉक्टरांनी पीडित मुलीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले होते. यावेळेस अज्ञात व्यक्तीने स्वतःचा मोबाईल नंबर व पत्ता न देताच घटनास्थळापासून पलायन केले. मृत्यूपूर्वी रुग्णालयात तीन अनोळखी महिला घटनास्थळी हजर असल्याचे तिच्या बहिणीने सांगितले.
अल्पवयीन मुलगी मयत झाल्यावर तिच्या रुग्णालयाचा पूर्ण खर्च पावणेदोन लाख रुपये आला होता. मात्र एका नगरसेवकाच्या मदतीने असलेले बिल कमी करून ते एक लाख रुपये करण्यात आल्यांनतर तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात मयत पीडितेस देण्यात आले. यावेळेस येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.
मात्र, मयत ही अर्धनग्न अवस्थेत असल्याने तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा दाट संशय तिच्या नातेवाईकांना आल्यावर याविरोधात वडार पँथर संघटनेचे दयानंद इरकल, सामाजिक कार्यकर्ते अशोक इटकर, बसपाचे दिलीप कुसाळे, जनार्दन कुसाळे यांच्यासह वडार समाजातील नागरिकांनी मृतदेहासह येरवडा पोलीस स्टेशनला घेराव घातला. हा घेराव दुपारी १२ वाजता घालण्यात आला.
समाजातील नागरिकांनी जवळपास तीन तासांहून अधिक काळ पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश, हंबरड्याने परिसर हादरून गेला. तर अनेक नातेवाईकांसह महिलांनी त्या मुलीबाबत हळहळ व्यक्त केली.
दरम्यान, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा या समाजाने घेतल्यावर येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतरच तब्बल तीन तासांनंतर पोलीस स्टेशनवरून मृतदेह हलविण्यात आला. यावेळेस पोलिसांनी जतष शाही (रा. नेपाळ) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याचे साथीदार जॉन करियल (रा. केरळ) व राजेश कावळे (रा. मुंबई) हे दोन आरोपी फरार असल्याचे समजते.
या मुलीशी जयेश याचा विवाह होणार होता. जयेश याला या घटनेचा धक्का सहन न झाल्याने पीडितेवर अंत्यसंस्कार होत असताना त्याने प्रथम हाताची शिर कापून घेतली व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, अंत्यसंस्कारास गेलेल्या पीडितेची आई व बहिण स्मशानभूमितून बेपत्ता झाल्याचे समजते. एकाच वेळी पोलिसांपुढे फरार आरोपी, तसेच तिची आई, बहिण, तिला घरून नेणारी व्यक्ती व या घटनेमागचा सूत्रधार शोधण्याचे आव्हान आहे.