पुणे ः जगविख्यात संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंडित शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य, जागतिक कीर्तीचे संतूरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांच्या संतूरवादनाची मैफल येत्या शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य तसेच इतर कलांविषयी युवा वर्गात रुची निर्माण करण्यासाठी तसेच युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या ऋत्विक फाउंडेशनतर्फे शनिवार, दि. २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस, ८० डावी भुसारी कॉलनी, वेदभवन मागे, चांदणी चौकाजवळ, कोथरूड पुणे येथे ही मैफल होणार आहे.
संतूर हे वाद्य जम्मू-काश्मीरमधील सुफियाना मौसकी या लोकसंगीतात अनेक वर्षांपासून वापरले जाते. पंडित शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला नवीन स्वरूपात हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात प्रस्तुत करून जगप्रसिद्ध केले आहे. फाउंडेशनच्या फ्लॅगशिप मासिक मैफलीअंतर्गत ‘स्वरानुभूती’ या कार्यक्रमात विख्यात कलाकारांचे नियमित सादरीकरण होते. याच मालिकेअंतर्गत पद्मश्री पंडित सतीश व्यास यांच्या संतूरवादनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. पंडित व्यास यांना ओजस आढीया तबलासाथ करणार आहेत.
गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून पंडित व्यास यांच्या संतूरवादनाच्या मैफली देशविदेशात होत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंडित व्यास जगप्रसिद्ध संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या आठवणींना उजाळा देत रसिकांसमवेत संवाद साधणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक सुदीप्तो मर्जित यांनी दिली.