पुणे | 10th SSC Result 2022 – राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे अनके शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. तसंच पालक, विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांचं अभिनंदनही करताना दिसत आहेत. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. यंदा कोकण विभागानं दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. अनेक जिल्ह्यात तर मुलांपेक्षा मुली सर्वश्रेष्ठ ठरल्या आहेत. पुणे जिल्ह्याचा निकालही ९६.७४ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील एका पठ्ठ्यानं सर्व विषयात ३५ गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
शुभम हा एका होतकरू कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो न्यू इंग्लीश स्कुल रमणबाग या शाळेत शिकत आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवलं आहे. शुभम दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्यानंतर सायंकाळी तो घरी येऊन अभ्यास करत असे.
शुभमला दहावीत ३५ टक्के गुण मिळवल्याबाबत काय वाटते असं विचारलं असता तो म्हणाला, “मला आनंद झाला पण एवढा नाही. मला ६०-५० टक्क्यांची अपेक्षा होती. पण तेवढे मिळाले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे. माझे मित्र ५० टक्क्यांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेक्षा खाली असल्याचे मला दु:ख वाटते. पण दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागते, असं तो म्हणाला.”
पुढे शुभम म्हणाला, “मी पुढे वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. मला भविष्यात पोलीस व्हायचे आहे. मला देशासाठी चांगलं काहीतरी करण्याची इच्छा असल्याने मी पोलीस होण्याचा विचार केला आहे.”