कृषि अर्थकारणाला रब्बीचा आधार

यंदा आपल्याकडे गहू, मोहरी, चणा, मसूर, मटार, बटाटे, कांदा, बार्ली, मका, लसूण ही रब्बी पिकं चांगल्या प्रमाणात येतील, अशी आशा आहे. पश्‍चिम बंगाल, आसाम, तेलंगण, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये तांदूळ हे रब्बीचं प्रमुख पीक आहे. तेही दणदणीत प्रमाणात येईल, असा अंदाज आहे. यावेळी खरिपात झालेलं नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, अशी आशा शेतकर्‍यांच्या मनात निर्माण झाली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे देशात अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सर्वच वातावरण प्रतिकूल नाही. देशात रब्बी हंगामातली पेरणी सुरू झाली असून, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक पेरा झाला आहे. मोहरी आणि हरबर्‍याच्या लागवडीचा जोर असून, गव्हाची पेरणी लवकरच सुरू होईल. परतीच्या पावसामुळे देशात खरीपाच्या पिकांचं खूप नुकसान झालं आहे. परंतु, रब्बी पेरणीसाठी भरपूर पाणी उपलब्ध झालं असून, देशात आतापर्यंत २५ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्रात ४६ टक्क्यांची वाढ आहे. एकूण लागवडीत सर्वाधिक प्रमाण मोहरीचं असून १५ लाख हेक्टरवर ही लागवड झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४० टक्क्यांची वृद्धी आहे तर हरबर्‍याच्या लागवडीतही दुपटीने भर पडली आहे. देशातल्या एकूण लागवडीपैकी राजस्थानात जवळपास १२ लाख हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला आहे. मागील हंगामात केवळ साडेसात लाख हेक्टर क्षेत्र मोहरीखाली होतं. उत्तर प्रदेशमध्येही मोहरीची पेरणी झालेलं क्षेत्र गेल्या वर्षी २ लाख ८० हजार हेक्टर होतं तर यंदा ते चार लाख हेक्टर इतकं आहे. केंद्र सरकारने यंदा मोहरीसाठी प्रति क्विंटल ५,४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये शेतकर्‍यांना यापेक्षाही जास्त भाव मिळाला आहे. जगात मंदीचे ढग पसरत असताना दिवाळीच्या मुहूर्तावर पीकपाण्याची सुवार्ता कानी येणं, ही दिलासा देणारीच बाब आहे. पिकांना दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे पाणी आणि दुसरी बाब म्हणजे पोषणद्रव्यं. तसंच चांगले भाव मिळतात तेव्हा शेतकरी उत्साहाने जादा लागवड करतो. सप्टेंबरमध्ये जादा पाऊस पडल्यामुळे भूगर्भातले पाणीसाठे वाढले आहेत. जून ते ऑगस्ट या काळात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाने दगा दिला होता. परंतु नंतर पडलेल्या पावसामुळे तिथल्या धरणांमध्ये आणि तलावक्षेत्रात पाण्याच्या पातळीत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या दहा वर्षांमधला सर्वाधिक पाऊस यंदा तिथे पडला. आता पाण्याची टंचाई नसल्यामुळे रब्बीची पिकं भरघोस येतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात सरकारने गव्हाच्या किमान आधारभावात (एमएसपी) प्रति क्विंटल २०१५ वरून २१२५ रुपयांपर्यंत वाढ केली तर मोहरीचे भाव क्लिटंलला ५०५० रुपयांवरुन ५,४५० रुपयांपर्यंत नेऊन ठेवले. याचा अर्थ गव्हाच्या भावात क्विंटलमागे ११० रुपये वाढ झाली. मागच्या दोन वर्षांमध्ये ते ४० आणि ५० रूपयांनीच वाढले होते. मोहरीचं पीक घेणार्‍या शेतकर्‍यांचाही लाभ झाला आहे. विशेष म्हणजे, नवीन किमान भावापेक्षा खुल्या बाजारातले भाव जास्त आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्साहात दुप्पट वाढ झाली आहे. २०२१-२२ च्या डिसेंबर-जानेवारीमध्ये युरियाची आयात ९०० ते १००० डॉलर प्रति टन या दराने केली जात होती. युरियामध्ये नत्राचं प्रमाण ४६ टक्के असतं. गेल्या जुलै महिन्यात डायअमोनियम फॉस्फेटच्या (डीएपी) आयात भावाचं प्रमाण टनाला ९५० ते ९६० डॉलर्स इतकं होतं. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के फॉस्फरस असतं. जुलै-सप्टेंबर २०२२ या दरम्यान फॉस्फरिक ऍसिडचे भाव प्रति टन १७१५ डॉलर्स इतके होते तर सल्फरचे दर पाचशे ते सव्वापाचशे डॉलर्स आणि अमोनियाचे दर १६०० डॉलर्स इतके होते.

परंतु, त्यानंतरच्या काळात सुदैवाने हे भाव घसरले आहेत. युरियाचा दर प्रति टन ६५० ते ६५५ डॉलर्स, डीएपी ७२० ते ७४० डॉलर्स, फॉस्फरिक ऍसिडचे ११७५ डॉलर्स, अमोनिया ८५० ते ९०० डॉलर्स आणि सल्फरचे दर १३० ते १३५ डॉलर्स इतके आहेत. तसंच फक्त म्युरेट ऑफ पोटॅशचे (एमओपी) भाव गेल्या वेळेपेक्षा दुपटीने वाढले आहेत. सध्या ते प्रति टन ५९० डॉलर्स इतके आहेत. बेलारूस आणि रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात एमओपीची आयात करतो. युक्रेनच्या युद्धामुळे उपरोल्लेखित दोन देशांमधून होणार्‍या आयातीवर परिणाम झाला आहे. कॅनडा, इस्रायल आणि जॉर्डनमधून हणारा एमओपीचा पुरवठा त्या प्रमाणात वाढला नाही. अर्थात एक एमओपीचा अपवाद केला तर युरिया, डीएपी वगैरेंच्या खतपुरवठ्यात कसलीही टंचाई नाही. त्यामुळे हवामान, पाण्याची उपलब्धता आणि खतं या दृष्टिकोनातून पाहता परिस्थिती अनुकूल आहे.

-हेमंत देसाई

Nilam: