मुंबई | Radhika Apte Reveals The Shocking Truth Of Bollywood – कोणत्याही चित्रपटात काम करायचं असेल तर आपण कसे दिसतो? आपली शरीरयष्टी कशी आहे? या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. तसंच या गोष्टींबाबत आपण कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या तोंडून ऐकलंच असेल. यामध्ये आता अभिनेत्री राधिका आपटेने बॅालिवूडचं सत्य उघड केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने चित्रपट करत असताना आलेल्या वाईट अनुभवाबाबत खुलेपणाने सांगितलं आहे.
राधिकाला अलिकडेच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. राधिकाला विचित्र कारणं देत अनेक चित्रपटांसाठी नाकारण्यात आलं. यासंदर्भात तिने स्वत: खुलासा केला आहे. Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने सांगितलं की, “काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नाकारण्यात आलं. याचं कारण देखील फार विचित्र होतं. माझ्या तुलनेमध्ये दुसऱ्या अभिनेत्रीचे ओठ आणि शरीराची ठेवण अधिक चांगली होती. दुसरी अभिनेत्री तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि ती खुप चालेल असं मला सांगण्यात आलं.”
पुढे राधिकाने सांगितले,” जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सल्ला सतत दिला जायचा. सुरवातीला मी दबावाखाली जगले. पहिल्याच भेटीमध्ये नाकाची सर्जरी कर असं मला सांगण्यात आलं. तर दुसऱ्या भेटीमध्ये स्तनाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला.”
“हे सत्र पुढेही तसंच सुरू राहिलं. सर्जरी कर असा सल्ला मी कित्येकदा ऐकला. केसांना कलर करायलाच मला तीस वर्ष लागली. पण या गोष्टींसाठी मी साधं इंजेक्शन देखील घेणार नाही. मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग यायचा. पण यामुळे मी माझ्या शरीरावर अधिक प्रेम करु लागले.” असंही राधिकानं म्हटलं आहे. दरम्यान, राधिकाचा ‘फॅारेंसिक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून या चित्रपटात ती अभिनेता विक्रांत मेसीबरोबर दिसणार आहे.