कोल्हापूर : शालेय मुलांनी रॅगिंग करून मित्राकडूनच ४० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. क्रशर चौकात एका नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलांनी मित्राचेच रॅगिंग केलं. तसंच त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळून ४० हजार रुपये लुटले. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. रॅगिंगमुळे घाबरलेल्या मुलाने सुरुवातीला याबद्दल कुणालाच माहिती दिली नाही. पण जेव्हा त्याने पैसे देण्यासाठी नसल्यानं घरातले दागिने चोरल्यानं हा प्रकार समोर आला. इयत्ता नववीत शिकणाऱ्या पीडित मुलाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्याच्याकडे पैसे असतात याची माहिती रॅगिंग करणाऱ्या मुलांना होती. त्यामुळेच त्याचा गैरफायदा घेण्यासाठी वर्गातल्या मित्रांनी त्याचं रॅगिंग करून काही पैसे उकळले. त्यानंतर सतत भीती घालून, धमकावून पैसे उकळत राहिले. घरातल्या फोनवरही मुलांनी मेसेज करून पैसे मागितले होते. तेव्हा घरच्यांना काही समजेल या भीतीने पैसे चोरून तो मित्रांना देत होता. शेवटी मित्रांनीच त्याला घरातले दागिने चोरायला सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पालकांनी तक्रार केली आहे.