पुणे फेस्टिव्हल : गुलाल, अबीर उधळत; राहुल देशपांडेंनी सादर केली सुरांची मैफल

पुणे : गुलाल हा गणपतीला प्रिय, तर पांडुरंगाला अबीर… गणेशापासून सुरू झालेली सूरांची मैफल अखेर कानडा राजा विठ्ठलापर्यंत येऊन थांबली. निमित्त होते राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे. ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये सोमवारी रात्री गायक राहुल देशपांडे यांची गायनाची मैफल झाली. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या बंदिशीने सुरू झालेल्या मैफलीची सांगता कानडा राजा पंढरीचा या भैरवीने झाली.

यंदाचा पुणे फेस्टिव्हल २०२२ अवॉर्ड राहुल देशपांडे यांना देण्यात आला आहे. फेस्टिव्हलच्या उदघाटन सोहळ्याच्या दिवशी ते परदेशात असल्याने अवॉर्ड त्यांना देता आला नव्हता. आजच्या संगीत मैफलीच्या मध्यतंरात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि मीरा कलमाडी यांनी “पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड 2022” देऊन राहुल देशपांडे यांचा सन्मान केला. या मैफिलीत साथसंगत करून रंग भरणा-या कलाकारांना स्मृती चिन्हं देऊन मिरजचे भाऊसाहेब पटवर्धन आणि गायत्रीदेवी पटवर्धन यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्यसंयोजक डॉ. सतीश देसाई रंगमंचावर उपस्थित होते. काका धर्मावत यांनी सूत्रसंचलन करताना राहुल देशपांड़े व त्यांच्या साथीदारांचा परिचय करून दिला. या मैफलीत राहुल देशपांडे यांना निखिल फाटक आणि प्रसाद जोशी यांनी तबला, मिलिंद कुलकर्णी हर्मोनियम, रोहन वनगे ऑक्टोपॅड, अमृता ठाकूरदेसाई कीबोर्ड आणि हृषिकेश पाटील – संपदा कुलकर्णी यांनी तानपु-यावर साथसंगत केली.

Dnyaneshwar: