नवी दिल्ली | Rahul Gandhi Defamation Case – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 30 दिवसांसाठी या शिक्षेची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली आहे. राहुल गांधींना वरच्या कोर्टात जाण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. राहुल गांधींनी 2019 साली कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सर्व चोरांचं आडनाव मोदी हेच कसं असतं? असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारानं पोलिसात तक्रार दाखल केली होता. यावर आज (23 मार्च) सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला आहे. यासंदर्भात आता प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “घाबरलेल्या सत्तेकडून राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करण्यात येत आहे. माझा भाऊ ना कधी घाबरला, ना कधी घाबरणार. ते खरं बोलत जगले आहेत आणि कायम खरंच बोलत राहतील. तसेच ते देशाचा आवाज उठवत राहतील. त्यांच्यासोबत खऱ्याची ताकद आणि कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे.”
शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींनीही ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महात्मा गांधींचा कोट शेअर केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे.”