राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, म्हणाले; “मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की…”,

बुलढाणा : (Rahul Gandhi On Chhtrapati Shivaji Maharaj) शुक्रवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ असा उल्लेख करत जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना मार्ग दाखवला, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेनं मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं, असंही त्यांनी नमूद केलं.

गांधी पुढे म्हणाले, “शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला मार्ग दाखवला. ही त्या शिवाजी महाराजांची भूमी आहे. आई मुलाला मार्ग दाखवते. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कोणी बनवलं? ते शिवाजी महाराज कसे झाले? हे शिवाजी महाराज नेमके काय होते? हो, ते एक व्यक्ती होते. मात्र, ते केवळ एक व्यक्ती नव्हते. त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे. तो फरक म्हणजे ते महाराष्ट्राचा आवाज होते.”

“जनतेच्या मनातील सर्व भावना शिवाजी महाराजांच्या मनात होत्या. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं. आज आम्ही त्यांचंही स्मरण करतो. जे शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांनी म्हटलं तेच काम ही भारत जोडो यात्रा करत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या यात्रेला पुरेपुर प्रेम दिलं. ३,५०० किमी चालणं सोपं काम नाही. मात्र, जनतेने हे काम सोपं केलं,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

Prakash Harale: