काश्मीर | राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काश्मीरमध्ये सुरू आहे. सोमवारी भारत जोडो यात्रेचा समारोप आहे. तत्पूर्वी रविवारी दुपारी राहुल गांधींनी श्रीनगरच्या (Srinagar) लाल चौकात (Lal Chowk) तिरंगा फडकवला. भारत जोडो यात्रेच्या सकाळच्या टप्प्यात फिरून राहुल गांधी दुपारी 12 वाजता लाल चौकात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते देखील उपस्थित होते.
लाल चौकात तिरंगा फडकावण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी वंदे मातरम गायले आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी त्याठिकाणी तिरंगा फडकावला. लाल चौकात तिरंगा फडकवल्यानंतर राहुल गांधी त्याठीकानाहून पुढे गेले. मात्र, यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथे जल्लोष साजरा केला.
मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांनी 31 वर्षांपूर्वी तिरंगा फडकवला होता
31 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 1992 रोजी मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. 1992 मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या टीमचा भाग होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुरली मनोहर जोशी यांच्यासह लाल चौकात तिरंगा फडकावला. त्यावेळी भाजपने तिरंगा फडकवण्याच्या घोषणेनंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपची यात्रा संपण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी पोलिस मुख्यालयावर ग्रेनेड फेकले होते. या हल्ल्यात तत्कालीन पोलीस महासंचालक जे.एन. सक्सेना जखमी झाले होते. मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने लाल चौक, श्रीनगर येथे तिरंगा फडकावला तेव्हा दहशतवाद्यांनी कारवाया करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण त्यांना यश आले नाही, असे म्हटले जाते.