मुंबई : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या देशव्यापी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून लोकींशी संपर्क साधत आहेत. कन्याकुमारी ते कश्मीर भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ३५७० किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत. ७ सप्टेंबर पासून या यात्रेला त्यांनी सुरुवात केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एक के स्टॅलीन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपवली आणि यात्रेला सुरुवात झालेली आहे. दरम्यान, भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या टी-शर्टच्या किमतीवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
भाजप नेत्यांच्या या टीकेवरून आता कॉंग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपला प्रतिउत्तर दिलं आहे. ‘कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतीसाद मिळत आहे. ते पाहून भारतीय जनता पार्टी बिथरली आहे. राहुल गांधी यांच्या टी – शर्टच्या किमतीसारखे बिनकामाचे मुद्दे भाजपला काढावे लागत आहेत. राहुल गांधींच्या टी-शर्टपेक्षा देशाच्या १३० कोटी जनतेला उघड्यावर आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची घटका भरत आली आहे. त्याची भाजपने आगोदर चिंता करावी.’ असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे.