मुंबई : (Rahul Shevale On Uddhav Thackeray) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. असं झालं तर शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रकट होतील, असं विधान राहुल शेवाळे यांनी दिल्ली येथिल पत्रकार परिषदेत केलं आहे.
दरम्यान राहुल शेवाळे म्हणाले की, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही जेव्हा परवानगी मागतो, तेव्हा हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही परवानगी मागत असतो. आमची स्पष्ट भूमिका आहे की, शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटलं पाहिजे. शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत.
उद्धव ठाकरेंना उद्देशून राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी ती सभा आयोजित करायची असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण तत्पूर्वी त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. आमचा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी जाहीर करायला पाहिजे. तरच शिवसैनिकांमध्ये संदेश जाईल की, शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रकट होतील.