खेडमध्ये रेल्वे भूसंपादन सुसाट; पहिल्या खरेदीखताने रेल्वे प्रकल्प ट्रॅकवर

राजगुरुनगर : खेड तालुक्यातून २१ गावातूून जाणार्‍या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनातील खेड तालुक्यातील पहिले खरेदीखत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाले. वरची भांबुरवाडीच्या वेहळदरा येथील शेतकरी विठ्ठल सोमाजी वेहळे यांना १६.७६ गुंठे जमीन, झाडे, बंगला यासाठी ८२ लाख ४६ हजार ८९३ रुपये मोबदला मिळाला. याप्रसंगी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सहमहाव्यवस्थापक सुनील हवालदार, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, महारेलचे अधिकारी सिद्धलिंग शिरोळे, मंदार विचारे, प्रेम मोटे, सहायक निबंधक रोहिणी तांगडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवत आहे. खेड तालुक्यातील मरकळ, सोळू, चर्‍होली खुर्द, आळंदी, धानोरे, केळगाव, गोळेगाव, रासे, कडाचीवाडी, काळुस, वाकी बु., खरपुडी खु, खरपुडी बु., मांजरेवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, खालची भांबुरवाडी, वरची भांबुरवाडी, जरेवाडी, जैदवाडी आदी २१ गावांतील ७० टक्के जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती प्रांताधिकरी चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेकरिता ९७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यासाठी १६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार २०% राज्य सरकार २०% आणि ६०% कर्जरुपाने निधी उभा केला जाणार आहे. २३५ किलोमीटर अंतर असणार्‍या पुणे-नाशिक सेमी हायस्ीपड रेल्वेचा प्रतितास २०० किमी धावणार असून २५ हजार जणांना रोजगार तयार होणार आहे.

या रेल्वे मार्गावर पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुरी, अंभोरे, संगमनेर, अमोण, नांदुर शिंगोटे, सिन्नर, मोहरी, वडगाव पिंगळे, नाशिक रोड अशी २० रेल्वेस्थानके आहेत, अशी माहिती महारेलच्या सूत्रांनी दिली.

Dnyaneshwar: