वळिवाचा पाऊस झालाच नाही; विहिरी,पाणवठे कोरडे

पुणे ः मान्सूनपूर्व म्हणजे वळिवाचा पाऊस यंदा जोरकसपणे झालाच नाही. परिणामी, देशभरातच विहिरी, पाणवठे कोरडे पडल्याने पाणीटंचाईची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात एका इंग्रजी वृत्तपत्राने अभूतपूर्व पाणीटंचाईकडे सरकार आणि लोकांचे लक्ष वेधले. वळिवाचा पाऊस न झाल्याने जनावरांसाठी लागणार्‍या हिरव्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला. वळिवाच्या पावसामुळे जमीन ओली होते, त्यामुळे जनावरांसाठी काही प्रमाणात हिरवे गवत उपलब्ध होते. हे गवत जनावरांना त्यांची भूक भागविण्याबरोबरच औषध म्हणूनही उपयोगी असते. यावेळी याचा अभाव अनेक ठिकाणी जाणवत आहे.

उत्तर भारतात अधूनमधून पाऊस पडत असला तरी, तेवढ्या पावसामुळे पाण्याच्या टंचाईवर मात होईल अशी स्थिती नाही. जून महिना निम्मा संपला तरी महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात पाणीटंचाई जाणवते आहे, असे स्वयंसेवी संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. दक्षिण भारतातही अशीच परिस्थिती आहे. राजकीय बातम्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम यातच प्रसारमाध्यमे मश्गुल झालेली आहेत. यंदा वळिवाचा पाऊस झालाच नाही त्यामुळे पाणीटंचाईची असलेली भीषणता प्रसारमाध्यमांतून जनतेसमोर आलेली नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. गेली दोन, तीन वर्षे वळिवाचा पाऊस पडलेलाच नाही, असे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले.

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर धरणांतील पाणीसाठा, तसेच पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्यकर्त्यांनी पाणीकपात अद्याप तरी टाळलेली आहे; परंतु यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त व्हायला हवा आणि धरणे पूर्ण क्षमतेने भरली जायला हवीत, तरच चालू वर्षी पाणीटंचाई टाळली जाणार आहे. आता कोरोनाची साथ निवळली असल्याने स्थलांतरित आपापले शिक्षण, नोकरी या कारणांनी पुन्हा पुण्यात आले आहेत.

Nilam: