मुंबई | Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari Controversial Statement – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. मराठी माणसाला डिवचू नका! आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.