“चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग आहे, तिथे जाऊन फक्त…”; राज ठाकरेंचा हल्लाबोल

पनवेल | Raj Thackeray – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई-गोवा महामार्ग आणि नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला. चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग आहे तिथे जाऊन खड्डेच तर बघायचे आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्च वाचला असता, असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावल आहे. ते पनवेल येथे कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, आत्तापर्यंत मुंबई-गोवा या रस्त्यावर 15 हजार 566 कोटी रूपये एवढा खर्च झाला आहे. रस्ता तर झाला नाही पण बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या आहेत. याबाबत मी गडकरींशी बोललो तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले तर काही कोर्टात गेले आहेत. या सगळ्यामागे काही कारण तर नसेल ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आधी शिवसेना भाजप आले त्यांच्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आली, आता तर सगळेच आले आहेत त्यामुळे कळत नाही नेमकं कोण आलं. पण तुम्हीही कसं काय यांना मतदान करता? आम्ही खड्यातून गेलो काय किंवा खड्यात गेलो काय? याबाबत महाराष्ट्रातील लोकांना कधीच काही वाटत नाही का? या सर्वांना एकदा धडा शिकवायलाच हवा, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

Sumitra nalawade: