मुंबई : बॅालिवूडचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॅाफ हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. तसंच ते नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी जॅकी श्राॅफ यांनी एका कार्यक्रमात फिटनेसबाबत आणि मराठी संभाषणाबाबत वक्तव्य केलं आहे.
नुकताच प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायिका आशा भोसले इत्यादी दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या फिटनेसबद्दल सांगितलं आहे.
यावेळी जॅकी श्रॅाफ म्हणाले, “डॉक्टर हे देवासारखे असतात. ते लहान मुलांना फार प्रेमाने सांभाळतात. आपण आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण त्यांना जे खायला देतो, त्याचे अप्रत्यक्षरित्या परिणाम हे त्यांच्या शरीरावर होत असतात. त्यामुळे मुलांना फ्राईड फूड देणे शक्यतो टाळलं पाहिजे. तसेच त्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे”.
“राज ठाकरे हे माझे फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांनी मला फार आधी एक गोष्ट सांगितली होती. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठीत बोलता आलं पाहिजे. मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो”, असंही ते म्हणाले.
पुढे जॅकी श्रॅाफ म्हणाले, “माझा मित्र आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज ठाकरे हे ट्रेंड चेंजर आहे. ते खूपच तरुण दिसतात”.