मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. तसंच राज यांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकांवरुन शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा सभेत उल्लेख केला आहे का? असा सवाल देखील ठाकरेंना केला होता. यासंदर्भात आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालची राज ठाकरे यांची सभा शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच होती की काय?, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरे त्यांच्या भाषणात कधी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही. तसंच लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचं जे वक्तव्य केलं ते धादांत खोटं असल्याचंही म्हणाले. ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ १३ वर्षांचे होते. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला, मात्र उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही. पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असं सांगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप देखील भुजबळांनी केला आहे.