मुंबई : धार्मिक स्थळ अधिकृत की अनधिकृत या वादात मला पडायचं नाही. कारण, महाराष्ट्रात हा वाद खूप मोठा होतो. धार्मिक स्थळाचा वाद हा नेहमीच मोठा होतो. राज ठाकरे यांना अचानक वाटायला लागले की ते बाळासाहेब होऊ शकतात. यामुळेच त्यांनी भोंग्यांचा विषय उकरून काढला, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मशिदींवरील भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाला यश आलं असं राज ठाकरे म्हणत आहेत. ते असं म्हणत आहेत याचा मला खूप आनंद झाला. कारण, भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात दंगे होतील, जाळपोळ होतील अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. मात्र, तसं काहीही झालं नाही. यामुळे ते आंदोलनाला यश आलं असं म्हणत आहेत तर चांगलेच आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पुढे आव्हाड म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. कितीही केलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाहीत.