मुंबई – Raj Thackeray Letter | गेल्या दोन महिन्यांपासून भोंगा प्रकरण (Bhonga) मनसे अध्यक्ष राज (MNS Raj Thackeray) ठाकरे यांनी उचलून धरले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा देखील घेतल्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण शांत झाल्यासारखे दिसत होते. मात्र अशातच आता राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना ट्विट करून एक पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे प्रकरण आता आपल्याला कायमच संपवायचं आहे. असं म्हणत त्यासाठी सर्व मनसे सैनिकांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत एक पत्र येईल ते आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवायचं आहे असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याशिवाय आपलं आंदोलन यशस्वी होणार नाही असंही ते म्हणाले आहेत.
काय आहे पत्रात ?
पत्रामध्ये राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.
काय आहे राज ठाकरेंच्या घरोघरी दिल्या जाणाऱ्या त्या पत्रात ?
काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी या पत्राचा उल्लेख केला होता. ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत की, माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. मी दिलेलं पत्र तुम्ही राहता त्या परिसरात स्वतः नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. असं त्यांनी सांगितलं आहे. ‘आपण राहत असलेल्या परिसरातील मशिदींवरील भोंग्याचा आवाज हा घरातील मिक्सर एवढाच असायला हवा, जास्त आवाज असेल तर परिसरातील सर्वांनी मिळून सह्या घ्या आणि त्याबाबतचे पत्र पोलिसांना द्या.’ असा संदेश त्या पत्रात राज ठाकरेंकडून देण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे.