मुंबई : (Raj Thackeray On Sharad Pawar) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप भाजपने घडवून आणला आहे. राष्टवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत खोटक टोला लगावला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? अशाप्रकारचं ट्विट त्यांनी केला आहे.