“…किंमत मोजावी लागतेय, आपलं कुठेतरी चुकतंय;” सणांमध्ये डॉल्बीच्या आवाजावर राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट

मुंबई : आपल्या उत्सवाची आणि आनंदाची किंमत आपण मोजतोय असं म्हणत सणांच्या मिरवणुकांतील डीजे, डॉल्बीवर (Dolbi) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बोट ठेवलं आहे. उत्सव, आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. डीजेच्या आवाजाचा अनेकांना त्रास होतोय, त्याचा परिणामही अनेकांवर होतोय, आपलं कुठेतरी चुकतंय याचा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी घडत असल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट (Raj Thackeray Social Media Post) लिहिली असून त्यामाध्यमातून हे मत मांडलं आहे.

राज्यात नुकतंच गणपती विसर्जनाची मिरवणूक पार पडली. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी डॉब्लीचा दणदणाट ऐकायला मिळाला. त्याच्या आवाजाने काही जणांचा जीव गेला तर अनेकांना कायमचं बहिरेपण आल्याच्या बातम्या आल्या. या सर्वावर राज ठाकरेंनी एक विचार करायला लावणारा पोस्ट लिहिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “डीजे,डॉल्बीच्या आवाजांमुळे अनेकांना त्रास झाला. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की. पण, गणेश उत्सवात 10 दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं किंवा बहिरेपण येणं किंवा मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. सलग 24 तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको.”

राज ठाकरे पुढे लिहितात की, “त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे.”

मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर विचार आणि कृती करायला हवी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

Prakash Harale: